बारामती । Baramati
महाविकास आघाडीने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना संधी देऊन अजित पवार यांच्याविरोधात त्यांच्याच सख्या पुतण्याला उभं केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका-पुतण्या लढत पाहायला मिळत आहे.
दरम्यान, युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. शेकडो कार्यकर्ते, कुटुंबीय आणि मित्र परिवार यावेळी उपस्थित होते. सुप्रिया सुळे आणि शरद पवारही बारामती कार्यालयात स्वतः हजर राहिले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी हे विधान करून एका प्रकारे अजित पवार यांच्याविरुद्धच शड्डू ठोकला आहे.
शरद पवार म्हणाले, “हा प्रश्न फक्त बारामतीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. मी जवळपास सर्वच जिल्ह्यांचा आढावा घेत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास ४८ पैकी ३१ जागा निवडून आल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा मी अंत:करणापासून आभारी आहे.”
तसेच, “मी जनतेला विश्वास देतो की लोकसभेमध्ये जनतेने जी कामगिरी केलेली आहे, त्याची नोंद आम्ही आमच्या अंत:कारणात कायम ठेवलेली आहे. आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू झालेली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळ्या जागा लढवत आहोत. सर्व जागांवर आम्ही एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न करतोय,” असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार यांनी आपल्यासोबत शरद पवार सुप्रिया सुळे खंबीरपणे उभे आहेत. तसंच, कुटुंब म्हणून आई-वडिलही उपस्थित आहेत. तसंच, संपूर्ण बारामतीकर सोबत आहेत असा विश्वासही युगेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसंच, बोलण्यासाठी माझ्याकडे जास्त काही नाही. कारण मी लहाण असल्यापासून मी शरद पवार साहेब यांना पाहत आलो आहे. तसंच, पवार साहेब माझा अर्ज भरण्यासाठी माझ्यासोबत आले त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहील असंही ते यावेळी म्हणाले आहेत.