मुंबई । Mumbai
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना आज शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ”आम्ही हे करु” नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मनसेच्या जाहीरनाम्यात मुलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा, तरुणांना नोकरी अशा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मनसेने भर दिला आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यातील प्रमुख १० मुद्दे
मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
दळणवळण वीज पाण्याचे नियोजन
सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग
राज्याची औद्योगिक प्रगती
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार
गडकिल्ले संवर्धन
कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास
राज्याचे करत धोरण सुधारणार
डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन
घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सा
दरम्यान, मनसेच्या जाहीरनाम्यात ‘लाडकी बहीण योजना’ किंवा ‘महालक्ष्मी योजना’ यासारख्या योजनांचा समावेश का नाही, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, याचं कारण महाराष्ट्राचं एकूण आर्थिक गणित पाहिल्याशिवाय मी असल्या घोषणा करु शकत नाही. असल्या घोषणांना अर्थ नसतो. महाराष्ट्रावर आर्थिक बोजा न येता या योजना सुरु राहिल्या तर मी त्याला गिफ्ट म्हणेन. पण उद्या या गोष्टी सुरु राहिल्या नाहीत तर मी या योजनांना लाच म्हणेल. अशा योजना सुरु करताना राज्याचा आर्थिक ढाचा बिघडता कामा नये. सरकारकडून महिलांना पैसे मिळतात, याचा आनंदच आहे. पण या सगळ्यातून आपण काही वेगळे खड्डे तर खणून ठेवत नाही ना, हेदेखील तपासले पाहिजे.