मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी दुसरी यादी जाहीर करण्यात आली होते. या यादीत तब्बल १५ जणांचा समावेश होता. त्यानंतर आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात तीन जणांचा सामवेश आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या यादीत ६५ उमेदवारांची नावे होती. त्यानंतर आज सकाळी १५ आणि त्यानंतर तीन उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ८३ उमेदवार घोषित झाले आहेत. मविआत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी ९० जागा आल्या आहेत. तर उर्वरित जाता मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. यात काँग्रेसने आतापर्यंत ७१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ४५ उमेदवारांची घोषणा केली आहे.
आज सकाळी जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून धुळे शहर-अनिल गोटे, चोपडा (अज)- राजू तडवी,जळगाव शहर-जयश्री सुनील महाजन,बुलढाणा- जयश्री शेळके,दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल हिंगोली-रुपाली राजेश पाटील,परतूर-आसाराम बोराडे,देवळाली (अजा) योगेश घोलप,कल्याण पश्चिम-सचिन बासरे, कल्याण पूर्व -धनंजय बोडारे,वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव,शिवडी-अजय चौधरी, भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा-अनुराधा राजेंद्र नागावडे,कणकवली-संदेश भास्कर पारकर यांच्या नावाचा समावेश आहे.
दरम्यान दुसऱ्या यादीनंतर जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे आहेत. यात वर्सोवातून -हरुन खान,घाटकोपर पश्चिम -संजय भालेराव आणि विलेपार्लेतून-संदिप नाईक यांना संधी देण्यात आली आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पहिल्या यादीत ६५ उमेदवारांची नावे जाहीर कऱण्यात आली होती. यामध्ये ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर करण्याल आली आहे. तर वरळीतून आदित्य ठाकरे आणि वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.