Sunday, November 24, 2024
HomeराजकीयAjit Pawar NCP : अजित पवारांची दुसरी यादी जाहीर! सात नावांचा समावेश,...

Ajit Pawar NCP : अजित पवारांची दुसरी यादी जाहीर! सात नावांचा समावेश, नवाब मलिकांचा पत्ता कट

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आजच पाच जणांना पक्षात प्रवेश देऊन लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

- Advertisement -

तसेच गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होणार? याची चर्चा होती. त्यावरूनही आता पडदा उठला आहे. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हीला अणुशक्ती नगर विधानसभेसाठी तिकीट जाहीर झाले आहे.

तर झिशान सिद्दिकालाही आज पक्षप्रवेश देऊन वांद्रे पूर्व येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पोर्शे प्रकरणात वादग्रस्त ठरलेले वडगाव-शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांना तिकीट मिळणार का याविषयी चर्चा होती. मात्र, अजित पवारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

याआधी अजित पवारांनी ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर दुसरी यादी कधी येणार याविषयी उत्सुकता होता. मधल्या काळात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्यानं अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले. त्यानंतर आज त्यांनी दुसरी यादी जाहीर केली आहे.

अजित पवार गटाची दुसरी यादी

इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील
तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटील
अणुशक्तीनगर – सना मलिक
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
शिरुर- ज्ञानेश्वर कटके
लोहा – प्रताप चिखलीकर

नवाब मलिक यांना उमेदवारी का नाकारली?

मलिक हे अणुशक्तीनगरमधील विद्यमान आमदार आहेत. मलिक यांच्याऐवजी त्यांची कन्या सना मलिक ही निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांचा पत्ता कट झाला आहे. नवाब मलिक यांना उमेदवारी न देण्यावरून भाजपने ठाम भूमिका घेतली होती. मलिक हे मविआ सरकारच्या काळात मंत्री असताना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आणि दिलेल्या पुराव्यांमुळे नवाब मलिक हे तुरूगांत होते. त्याआधी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा घेत तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवला होता.

सध्या प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना पु्न्हा उमेदवारी दिल्यास विरोधकांना आयते कोलीत मिळेल. शिवाय त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतील असे अंदाज महायुतीच्या नेत्यांनी बांधला. पण अजित पवार मात्र नवाब मलिक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, त्यांना माघार घ्यावी लागली.

तसेच भाजप नेते आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.

तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी अजित पवारांना अपक्ष आमदार म्हणून पाठिंबा दिला होता. पण यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. ते वरुड मुर्शी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या