नाशिक | मनोज निकम | Nashik
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडमोर्डीना सुरुवात झाली आहे. महायुती व महविकास आघाडी यांच्यापैकी महायुतीमधील भाजपची (BJP) पहिली उमेदवार यादी (BJP Candidate List) जाहीर झाली आहे. यात नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय व माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते बंडखोरीच्या प्रयत्नात असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसेल की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे. यात गिते हातात तुतारी घेतात की नाही हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली संधी
भाजपामध्ये अल्पावधीतच पक्षात आपले विशेष स्थान निर्माण करणारे. नाशिक महानगरपालिकेत नगरसेवकांच्या प्रथम टर्ममध्ये सलग दोन वेळा स्थायी समितीपद भूषविणारे, संकटमोचक गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक गणेश गिते (Ganesh Gite) यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार होण्याचा चंग बांधला आहे. प्रथम गिते हे भाजपच्या वरिष्ठांशी वेळोवेळी संपर्कात राहून विधान परिषद व राज्यपाल नियुक्त यादीत आमदार (MLA) होण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, हाती काही लागले नाही. त्यांनी आमदार होण्याचा निर्धार केला आहे. सद्यस्थितीत गिते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत. यामुळे नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा : Political Special : दिंडोरी-पेठ मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाकडे निवडणुकीची वाटचाल?
गणेश गिते यांनी २०१४ मध्येही भाजपकडून उमेदवारी मागितली होती, परंतु त्यांना थांबवण्यात येऊन बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २०१९ मध्येही उमेदवारी मागितली त्यावेळीही त्यांना थांबविण्यात आले आणि अॅड. राहुल ढिकले यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे यंदा कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार केल्याने आता थांबणे शक्यच नाही असे ठरवले. गेले काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते. महाविकास आघाडीतदेखील हीच परिस्थिती आहे. गिते यांच्याकडून आता हालचालींना वेग आला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) सर्वेसर्वा शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटी घेतल्याचे खात्रीलायक वृत्त समजते. त्यांच्या सोबत काय चर्चा होते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. एक दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचेही समजते.
हे देखील वाचा : Political Special : कळवण-सुरगाणा मतदारसंघात आमदार पवार-गावितांमध्येच मुख्य लढत
वेट अँड वॉचची भूमिका
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवारांची घोषणा केली आहे. गिरीश महाजन आणि चंद्रकांत दादा पाटील यांचे निकटवर्ती समजले जाणारे स्थायी समितीवर दोनदा निवडून गेलेले गणेश गिते यांनीं पूर्व विधानसभा मतदार संघातून आमदार होण्याचा चंग बांधला होता मात्र त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, यात त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून तुतारीवर निवडणूक लढवितात की, अन्य काही मार्ग अवलंबतील हे पुढील काळात स्पष्ट होईल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा