मुंबई | Mumbai
महायुतीमधील जागा वाटपावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त असून मोजक्या जागांवरुन भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद असून हे मतभेद राज्यातच सोडवले जातील असं सांगितलं जात आहे.
मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन जोरदार घामसान सुरु आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआमध्ये १७ जागांवर तिढा असल्याची माहिती दिली. विदर्भातील पाच ते सहा जागांवर वाद असल्याचेही त्यांनी सांगितले. जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होईल, हेही सांगायला ते विसरले नाहीत.
जागावाटपाची चर्चा संपल्यात जमा आहे. १५ -१६ जागांची चर्चा बाकी आहे. ७-८ जागा आमच्यात बदलायच्या ठरवलं आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल. उद्या संध्याकाळी आम्ही जागा जाहीर करु, असे वडेट्टीवार म्हणाले. काही प्रमाणात थोडीफार नाराजी असतेच.त्यांची आम्ही समज घालू आणि आघाडी म्हणून एकत्र लढू. तिन्ही पक्षांचा १७ जागांचा तिढा आहे. तो उद्या रात्री पर्यंत सुटेल. काल आम्ही हायकमांड सोबत चर्चा करून माहिती दिली. मार्ग कसा काढायचा यावर देखील त्यांच्याशी आम्ही बोललो. ३० जागा घेऊन आम्ही आज CEC मधे जात आहोत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.