मुंबई । Mumbai
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून आले. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले.
दरम्यान राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. गेल्या काही काळात जयंत पाटील यांनी भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर असल्याची चर्चा होती. जयंत पाटील यांचे भाषण सुरु असताना सत्ताधारी बाकावरुन त्यांना पुन्हा एकदा साद घालण्यात आली.
जयंत पाटील आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, अजितदादांचं माझ्या बोलण्यावर जास्त लक्ष असतं. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, लक्ष असून उपयोग काय तुम्ही प्रतिसाद देत नाही. यावर प्रत्युत्तरात ते म्हणाले, त्यावर आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे दादा. योग्यवेळी योग्य निर्णय, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी करताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
अजित पवारांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर जयंत पाटलांनी राहुल नार्वेकरांचीही शाळा घेतली. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही चिमटे काढले आहेत. ते म्हणाले की, नार्वेकरांना मी खासगीत सांगायचो की पुढच्या वेळी मंत्री व्हा. मात्र विधानसभा अध्यक्षपदी असताना आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी असा निकाल दिला की सुप्रीम कोर्टालाही अजून विचार करावा लागतोय, असं म्हणत जयंत पाटलांनी चिमटा काढला.