मुंबई । Mumbai
दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीत तणावाचे ढग जमा झाले होते. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, आता भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते प्रसाद लाड यांनी या वादात थेट उडी घेत, या कथित ऑडिओ क्लिपचे मुख्य सूत्रधार शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊतच असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “ही ऑडिओ क्लिप म्हणजे दुसरे काही नसून महायुतीमध्ये फूट पाडण्यासाठी रचलेला एक राजकीय कट आहे. या क्लिपचे खरे ‘रायटर’ आणि ‘डायरेक्टर’ संजय राऊत आहेत. ‘सामना’च्या स्टुडिओमध्ये आणि प्रेसमध्येच ही संपूर्ण स्क्रिप्ट तयार करण्यात आली आहे.” एवढेच नव्हे तर, “संजय राऊत यांनी आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट व्हॉईस ओव्हर तयार केला आहे,” असा सनसनाटी दावाही लाड यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करणे आणि महायुतीत मिठाचा खडा टाकणे हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला. लाड पुढे म्हणाले, “आमच्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोणतेही भांडण होणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने शिंदेंच्या पाठीशी उभे आहोत. जे घडले ते चुकीचेच होते, त्यामुळे या ऑडिओ क्लिपची सखोल आणि निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. ही क्लिप कोणी बनवली, ती जरांगे पाटलांपर्यंत कशी पोहोचली, याचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे.”
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी लाड यांनी केली आहे. “या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून सर्वात आधी संजय राऊत यांची चौकशी केली पाहिजे आणि त्यांना ताब्यात घेतले पाहिजे. चौकशी झाली की सत्य काय ते समोर येईलच,” असे ते म्हणाले.
तसेच, महायुतीचे घटक असलेले बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे,” असे सांगत त्यांनी भाजप आणि शिवसेनेतील ऐक्य अबाधित असल्याचा पुनरुच्चार केला. या नव्या आरोप-प्रत्यारोपामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




