मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी (BJP State President) कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यासाठी आज चव्हाण यांनी केंद्रीय भाजपने (BJP) निरीक्षक म्हणून नेमलेल्या केंद्रीयमंत्री किरण रिजिजू (Kiran Rijiju) यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
भाजपच्या पद्धतीनुसार प्रदेशाध्यक्ष या पदासाठी अर्ज मागविले जातात. त्यानुसार आज (सोमवार) रवींद्र चव्हाण यांनी आपला अर्ज दाखल केला. उद्या (मंगळवार) दुपारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून, सायंकाळी पाच वाजता भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निरीक्षक किरण रिजिजू यांच्याकडून घोषणा करण्यात येईल. तसेच एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाईल. मात्र, निवडणूक होण्याची शक्यता कमी असून, रवींद्र चव्हाण यांचीच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी (State President) बिनविरोध निवड होणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीत (Loksabha Eletion) महाराष्ट्रात भाजपला मोठे अपयश आले होते. त्यानंतर माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची जानेवारी २०२५ मध्ये भाजपच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
रवींद्र चव्हाण यांची राजकीय वाटचाल
रवींद्र चव्हाण हे २००७ मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २००७ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना भाजप नगरसेवक असूनही ते स्थायी समितीचे सभापती झाले. तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून रविंद्र चव्हाण यांना पक्षाने २००९ मध्ये उमेदवारी दिली आणि ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. यानंतर २०१४ मध्ये ते दुसर्यांदा आमदार झाले. यावेळी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. तसेच रायगड आणि पालघर जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाची जबाबदारी देखील त्यांना मिळाली होती.
यानतंर २०१९ मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. त्यांचा २०२१ मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात मोलाचा वाटा होता. त्यामुळे रवींद्र चव्हाणांची २०२१ मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर २०२४ मध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. यानंतर आता त्यांना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे.




