मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू असून आज (सोमवारी)उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. निवडवणुकीत दिलेल्या आश्वासने अर्थसंल्पात पूर्ण होणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होते. ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट येत्या ५ वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. यात घरकूल योजनेतील निधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सर्व घरांवर सौरउर्जा प्रकल्प बसवले जाणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दीष्ट येत्या पाच वर्षांत साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत एकूण ४४ लाख ७ हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहेत”, असे त्यांनी म्हटले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – २ अंतर्गत सन २०२४-२५ करिता २० लाख घरकुलांच्या उद्दीष्टापैकी सुमारे १८ लाख ३८ हजार घरकुलांना मंजुरी दिली असून १४ लाख ७१ हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही योजना राबविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत”, असे देखील अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “प्रधानमंत्री आवास योजना, शहरी- १ अंतर्गत ४ लाख ४२ हजार ७४८ घरकुले मंजूर असून त्यापैकी २ लाख ८ हजार ३०४ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे बांधकाम ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. प्रधानमंत्री आवास योजना – शहरी २.० अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी ५ लाख घरकुलांचे उद्दीष्ट असून त्यासाठी ८ हजार १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती तसेच सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे. असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
तर ‘पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून आतापर्यंत १ लाख ३० हजार घरगुती ग्राहकांनी ५०० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरील सौर उर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. ० ते १०० युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे १.५ कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर उर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य शासनाकडून सुरु करण्यात येणार असून या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे ७० टक्के वीज ग्राहकांचे वीजबील टप्प्या टप्प्याने शून्यावर येईल”, अशी माहिती देखील अजित पवारांनी दिली.