मुंबई | Mumbai
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्यानुसार येत्या २३ एप्रिलला मतदान आणि ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. उद्या (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने मविआतील काँग्रेसकडून (Congress) बारामती आणि राहुरीसाठी आज संध्याकाळपर्यंत उमेदवार घोषित होऊ शकतो. यामध्ये बारामतीसाठी काँग्रेसकडून रोहित बनकर, डॉ. विजयकुमार पिसे आणि आकाश मोरे यांच्या नावाची चर्चा असून, आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती पोटनिवडणुकीत (Baramati By-Elections) काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याविरोधात धनगर समाजाचा चेहरा देण्याची तयारी करत आहेत. बारामतीमध्ये धनगर समाजाचे मतदार अधिक प्रमाणावर असल्याने या निवडणुकीसाठी धनगर समाजातील आकाश मोरे यांना काँग्रेसकडून (Congress) संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवाराचा उद्या बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल.
ठाकरे आणि शरद पवार गटाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
बारामती विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aagahdi) महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. पंरतु, काँग्रेस ही निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील एका गटाने आक्रमक पवित्रा घेत सुनेत्रा पवार या महायुतीकडून लढत असताना आपण त्यांना पाठिंबा का द्यावा? जर आपण याठिकाणी माघार घेतली, तर पक्ष आणि कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवार गटाने किंवा महाविकास आघाडीतील इतर कोणीही उमेदवार दिला नाही तर शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव देखील ठाकरे सेनेतील एका गटाने उद्धव ठाकरेंसमोर मांडल्याचे समजते.
अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्त
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे दि.२८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. तर राहुरीचे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या घोषणेवेळी महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. त्यानुसार ही निवडणूक २३ एप्रिल रोजी पार पडणार असून, यासाठी भाजपने राहुरीतून शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. तर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत कोणाचा विजय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत दाखल अर्ज
अभिजीत बिचुकले (अपक्ष)
सतिश कदम (हिंदुस्तान जनता पार्टी)
सागर भिसे (अपक्ष)
सागर भिसे (अपक्ष)
राघू घटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी )
गजानन गवळी (अपक्ष)
त्रिशाला कांबळे (अपक्ष)
दिलीप अळोणी (अपक्ष)
दत्तात्रेय बेदरे (अपक्ष)
अरूण निटुरे (राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी )
मिथून आटोळे (अपक्ष, बारामती)
रजाक मुलाणी (अपक्ष)
संदीप खरात (अपक्ष)
विलास होळकर (अपक्ष, बारामती)
अनिल तुपे (अपक्ष)
संकेत गावडे (अपक्ष, बारामती)
दादा थोरात (अपक्ष, बारामती)
अभिजीत कांबळे (अपक्ष, बारामती)





