मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा (Mahayuti Government) आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची जोरदार तयारी केली असून दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी फोन केले आहेत.
भाजपकडून (BJP) आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार गोरे, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे आणि माधुरी मिसाळ यांना शपथविधीसाठी फोन गेले आहेत.
तसेच शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde Shivsena) भरत गोगावले, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जैस्वाल, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, प्रकाश आबीटकर,संजय शिरसाट, संजय राठोड आणि दादा भूसे यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन गेला आहे. तर दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार या माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे..शिवसेनेत ५ जुने मंत्री आणि ७ नवीन आमदारांना म्हणजे एकुण १२ जणांना संधी मिळणार आहे.
त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आले आहेत. तर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अनिल पाटील, संजय बनसोड या नेत्यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही.