नवी दिल्ली | New Delhi
महायुती सरकारमधील (Mahayuti Government) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा (CM and DCM) गुरुवार (दि.०५) डिसेंबर रोजी शपथविधी झाल्यानंतर आता सगळ्यांची उत्सुकता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि खातेवाटपाकडे लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यात बैठक झाली. या बैठकीत महायुती सरकारमध्ये कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं येणार, याचा फॉर्म्युला ठरला आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून येत्या १४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत महायुती सरकारमध्ये भाजपला (BJP) २० खाती मिळतील. तर, राष्ट्रवादी १० आणि शिवसेनेला १२ खाती मिळतील असे सांगितले जात आहे. महायुतीमध्ये आमदारांची (MLA) वाढलेली संख्या पाहता मंत्रिमंडळात अडीचृ-अडीच वर्षांचे रोटेशन पद्धत राहण्याची शक्यता आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाला काही महत्त्वाच्या खात्यांसह त्यांच्या पक्षाचे आमदार असलेल्या एखाद्या लहान राज्याचे राज्यपालपद (Governorship) मिळू शकते, असे बोलले जात आहे. तर १४ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास या दिवशी ३० ते ३५ मंत्री शपथ घेऊ शकतात, असे बोलले जात आहे.
कुणाकडे कोणतं खातं?
देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत झालेल्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. यात गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील, असे सांगण्यात येत आहे. तर नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला महसूल मिळू शकते. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खाते इतर गटाला सोपवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार दिल्लीत, एकनाथ शिंदे मुंबईत
काल अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्लीला रवाना झाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भाजपश्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला जातील, अशी चर्चा होती. मात्र, एकनाथ शिंदे हे मुंबईतच थांबले होते. दरम्यान, दिल्लीत असणारे अजित पवार आज भाजपच्या कोणत्या नेत्यांना भेटणार का, हे बघावे लागेल.
आज महायुतीची बैठक
देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज बैठक होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन आणि खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.