मुंबई | Mumbai
दहावीच्या परीक्षेत (SSC Reuslt) यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
“शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवा, यश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!”असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही शुभेच्छासंदेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल हा ९६.९४ टक्के लागला आहे. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा असला तरी अंतिम साध्य नाही. त्यामुळं अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीनं आपलं व्यक्तिमत्व अष्टपैलू, सर्वांगसुंदर घडविण्याचा प्रयत्न करावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. परंतू विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला, क्रीडा, छंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.