Tuesday, January 6, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Cold Wave : आरोग्य जपा! वर्षातील शेवटचा आठवडा भयंकर थंडीचा, काय...

Maharashtra Cold Wave : आरोग्य जपा! वर्षातील शेवटचा आठवडा भयंकर थंडीचा, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

मुंबई । Mumbai

उत्तर भारतात हिमवृष्टीचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी, तिथून येणाऱ्या बोचऱ्या शीतलहरींमुळे संपूर्ण देशात थंडीचा कडाका वाढला आहे. पूर्वोत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत तापमानाचा पारा घसरला असून, चालू वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाचे स्वागतही कडाक्याच्या थंडीतच होणार असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने (IMD) दिले आहेत. उत्तर भारतातील या हवामानाचा थेट परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रावरही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्रासह सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. राजधानी मुंबईतही थंडीची चाहूल लागली असून रात्रीपासून पहाटेपर्यंत शहर आणि उपनगरे गारठलेली असतात. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसा कडक ऊन असले तरी, सूर्यास्तानंतर वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे वातावरणात गारवा निर्माण होत आहे. मुंबईकरांसाठी ही थंडी सुखावणारी असली तरी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पारा १० ते १२ अंशांच्या खाली गेल्याने हुडहुडी वाढली आहे.

YouTube video player

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील ४८ तास आणि वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात थंडीचा जोर कायम राहील. नवीन वर्षाची सुरुवातही अशाच थंड वातावरणात होईल, मात्र त्यानंतर तापमानात काही अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या हिमालयाच्या परिसरात अपेक्षित बर्फवृष्टी झाली नसली तरी, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात येत्या काळात हिमवृष्टीचा अंदाज आहे. यामुळे देशातील इतर राज्यांमध्येही थंडीचा कडाका अधिक तीव्र होऊ शकतो.

उत्तर भारतात थंडीने ‘रौद्र’ रूप धारण केले असून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये दाट धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने या भागात ‘यलो अलर्ट’ जारी केला असून हा इशारा किमान आठवडाभर कायम राहणार आहे. धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, सतत बदलणाऱ्या या हवामानामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्यात सोलापूरमधील जेऊर येथे नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडीची ही लाट कायम राहणार असल्याने विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विविध शहरांतील तापमानाची (अंश सेल्सिअसमध्ये) स्थिती खालीलप्रमाणे आहे:

  • जेऊर: ८.५
  • गोंदिया: ९.४
  • नाशिक: ९.६
  • मालेगाव: ९.८
  • नागपूर: १०.६
  • सातारा: ११.०
  • महाबळेश्वर: ११.७
  • मुंबई: १८.०

काय काळजी घ्यावी?

  • उबदार कपड्यांचा वापर: सकाळी आणि रात्री घराबाहेर पडताना कानटोपी, मफलर आणि स्वेटरचा वापर अनिवार्य करावा.
  • आहारत बदल: आहारात आले, लसूण, गूळ आणि तुळशीचा वापर वाढवावा. गरम आणि ताजे अन्न खावे.
  • पाण्याचे प्रमाण: तहान लागत नसली तरी शरीरातील आर्द्रता टिकवण्यासाठी कोमट पाणी पिणे सुरू ठेवावे.
  • व्यायाम: शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम किंवा योगासने करावीत.

कोरड्या हवेमुळे त्वचा फाटणे, ओठ फुटणे किंवा खाज येणे यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. यावर उपाय म्हणून खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझरचा वापर करण्याचा सल्ला त्वचाविकार तज्ज्ञांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...