Sunday, April 6, 2025
Homeब्रेकिंग न्यूजHarshwardhan Sapkal : "जनतेला मूळ प्रश्नांपासून भरकटवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून..."; सपकाळांचा घणाघात

Harshwardhan Sapkal : “जनतेला मूळ प्रश्नांपासून भरकटवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून…”; सपकाळांचा घणाघात

नाशिक | Nashik

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (Maharashtra Pradesh Congress Committee) अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) आज रविवारी(दि.०६) रोजी नाशिक दौर्‍यावर होते.यावेळी त्यांनी रामनवमीनिमित्त शहरातील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच विविध कार्यक्रमांनी देखील हजेरी लावली. यावेळी सपकाळ यांनी शहरातील काँग्रेस कार्यालयात (Congress Office) झालेल्या बैठकीत पदाधिकार्‍यांना संबोधित करतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि महायुतीसह भाजपवर टीका केली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “भाजप आणि त्यांच्या संस्था प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव फक्त राजकारणासाठी घेत आहे. राज्यातील आणि देशातील (Country) सर्वसामान्य व्यक्ती जन्माला आल्यापासून रामाचा भक्त आहे. त्यामुळे भाजपला रामभक्त असणारा हा सामान्य माणूसच एक दिवस सत्तेतून बाहेर फेकेल. भगवान गौतम बुद्ध यांनी वेगळा धर्म स्थापन केला. महावीरांनी वेगळे तत्त्वज्ञान मांडले. संत बसवेश्वरांनी वेगळ्या धर्म सांगितला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा वारकरी पंथ निघाला. या संतांना कोणत्या विचारसरणीने त्रास दिला. त्यावेळी तो कोणाच्या विरोधात आणि कोणापासून वेगळा निघाला. तेव्हा औरंगजेब होता का?. संघ आणि भाजप ज्याचे प्रतिनिधित्व करतात तीच सडकी धार्मिक प्रवृत्ती या सगळ्यांना त्रास देत होती”, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

पुढे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या १२ एप्रिलला रायगड किल्ल्यावर (Raigad Fort) येणार आहेत. मात्र, त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कठोर शिक्षा होईल अशी तजवीज करावी. तसेच राहुल सोलापूरकरला अटक करावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी यांच्या “बंच ऑफ थॉट्स” या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्या पुस्तकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतरच रायगड किल्ल्यावर यावे”, असेही त्यांनी म्हटले.

तसेच “महायुतीमधील भाजप व त्यांच्या विचाराच्या नेत्यांपासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. महाराष्ट्रात (Maharashtra) २८८ पैकी २३९ आमदार सत्ताधारी महायुतीचे (Mahayuti) आहेत, केंद्रातही त्यांचेच सरकार आहे. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेचे वाढीव मानधन, शेतमालाला भाव, युवकांना नोकऱ्या का मिळत नाही? यावरून हे सर्व लोक जनतेची फसवणूक करीत असल्याचे दिसत आहे. जनतेच्या मूळ प्रश्नांपासून भरकटवण्यासाठी ते औरंगजेबसारखा विषय काढून दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. मात्र, त्यांचे हे सर्व राजकारण काँग्रेस पक्ष एकदिवस उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही”, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या