अहिल्यानगर (प्रतिनिधी)
गत अनेक दिवसांपासून धरणांच्या पाणलोटासह लाभक्षेत्रात पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा भंडारदरा वगळता अन्य धरणांमध्ये दुप्पट, तिप्पट पाणी असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळालेला आहे.
जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे ही मोठी धरणं, शिवाय नाशिक दारणा, गंगापूर आणि अन्य धरणांतून तसेच पुणे जिल्ह्यातील कुकडी आणि घोड नदीच्या पाण्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतीचे भवितव्य अवलंबून असते. तसेच येथील उद्योग-व्यवसायाची भरभराटही याच पाण्यावर होते. या जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनाही याच धरणांतील पाण्यावर अवलंबून आहेत. सुदैवाने जून आणि जुलैच्या सुरवातीला कोसळलेल्या पावसामुळे या सर्व धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. एवढेच नव्हेतर या जिल्ह्याच्या जिवनदायिनी समजल्या जाणाऱ्या गोदावरी, मुळा आणि प्रवरा या नद्या अजूनही वाहत्या आहेत.
भंडादरात सध्या ७५.५५ टक्के पाणीसाठा आहे. मागीलवर्षी याचा कालावधीत ४४.९० टक्के पाणीसाठा होता. निळवंडे धरणात आज मितीला ८७.५० टक्के पाणी आहे. मागीलवर्षी याच कालावधीत केवळ १८.६१ टक्के पाणीसाठा होता. मुळा धरणात ७३.५७ टक्के पाणीसाठा आहे. मागीलवर्षी याच कालावधीत अवघा २०.५६ टक्के पाणीसाठा होता. सीना धरण यंदा ओव्हरफ्लो झाले. गतवर्षी हे धरण रिकामे होते.
दारणात ७९.०४ टक्के पाणीसाठा आहे. मागीलवर्षी याचा कालावधीत २४.३४ टक्के पाणीसाठा होता. गंगापूर धरणात ६१.६२ टक्के पाणीसाठा आहे. मागीलवर्षी याच कालावधीत ४४.०८ टक्के पाणीसाठा होता. कुकडी प्रकल्पातील सर्वाधिक साठा क्षमता असलेले डिंभे धरणात यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. सध्या या धरणात ७६.२६ टक्के पाणी आहे. मागीलवर्षी याच कालावधीत २४.४९ टक्के पाणीसाठा होता. दरवर्षी पिंपळगाव जोगे या धरणात मायनसमध्ये पाणीसाठा असतो. पण यावर्षी या धरणात ३४.४५ टक्के पाणीसाठा आहे. येडगावमध्ये ६९ टक्के पाणीसाठा आहे. मागीलवर्षी याचा कालावधीत २६.५८ टक्के पाणीसाठा होता.
वडजमध्ये ६८.८० टक्के पाणीसाठा आहे. मागीलवर्षी याचा कालावधीत ३०.३३ टक्के पाणीसाठा होता. घोडमध्ये ९३ टक्के पाणीसाठा आहे. मागीलवर्षी याचा काळात केवळ ६ टक्के पाणीसाठा होता. जायकवाडी यंदा ७७ टक्के भरलेले आहे. मात्र गेल्यावर्षी या धरणात केवळ ४ टक्के पाणीसाठा होता. जायकवाडीतील पाणीसाठा समाधानकारक असल्याने अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यावर असणारे समन्यायीचे संकट टळले आहे.




