मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर केला. २०२४-२५ च्या पुर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये २०२३-२४ च्या तुलनेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित आहे. २०२४-२५ मध्ये कृषी व संलग्न कार्य, उद्योग व सेवा या क्षेत्रांच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धित अनुक्रमे ८.७ टक्के, ४.९ टक्के आणि ७.८ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले आहे.
काय आहे आर्थिक सर्वेक्षण अहवालात?
सन २०२४-२५ च्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन २०२३-२४ च्या तुलनेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ६.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. सन २०२४-२५ मध्ये ‘कृषि व संलग्न कार्य’, ‘उद्योग’ व ‘सेवा’ या क्षेत्रांच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धित अनुक्रमे ८.७ टक्के, ४.९ टक्के व ७.८ टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार सन २०२४-२५ मध्ये अंदाजित सांकेतिक (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ ४५,३१,५१८ कोटी आहे तर अंदाजित वास्तविक (सन २०११-१२ च्या स्थिर किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न ₹ २६,१२,२६३ कोटी आहे. पहिल्या सुधारित अंदाजांनुसार सन २०२३-२४ चे अंदाजित सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ₹ ४०,५५,८४७ कोटी आहे, तर सन २०२२-२३ मध्ये ते ₹ ३६,४१,५४३ कोटी होते. सन २०२३-२४ चे अंदाजित वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न ₹ २४,३५,२५९ कोटी आहे, तर सन २०२२-२३ मध्ये ते ₹ २२,५५,७०८ कोटी होते. पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा सर्वाधिक (१३.५ टक्के) आहे. सन २०२४-२५ मध्ये दरडोई राज्य उत्पन्न ₹ ३,०९,३४० अंदाजित असून सन २०२३-२४ मध्ये ते ₹ २,७८,६८१ होते.
लाडकी बहिण योजनेवर किती खर्च?
उपमुख्यमंत्री, राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर केला. त्यामध्ये २०२४-२५ या आर्थिक महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे जमा झाले, त्याबाबत आर्थिक पाहणी अहवालातून माहिती देण्यात आली. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला व मुलींचे पुनर्वसन, सक्षमीकरण तसेच आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्याने जून, २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली. या योजनेतंर्गत डिसेंबर, २०२४ पर्यंत २.३८ कोटी लाभार्थी महिलांना ₹ १७,५०५.९० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया व कापूस यांच्या उत्पादनात अनुक्रमे ४९.२ टक्के, ४८.१ टक्के, २६.९ टक्के व १०.८ टक्के वाढ अपेक्षित आहे. ऊस उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत ६.६ टक्के घट अपेक्षित आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये व कडधान्याच्या उत्पादनात अनुक्रमे २३ टक्के व २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. तेलबियांच्या उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत २२.७ टक्के घट होणार आहे. २०२३-२४ मध्ये फलोत्पादन पिकांखालील क्षेत्र २१.७४ लाख हेक्टर अपेक्षित असून ३२६.८८ लाख मे. टन उत्पादन अपेक्षित आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा