मुंबई | Mumbai
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) घोंगडे भिजत पडले होते. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल असताना राज्यपातळीवरही हे टिकणारे आरक्षण देण्याकरता सरकार प्रयत्न करत होते. अखेर मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) लढ्याला मोठे यश आले असून सरकारने सगेसोयरेबाबतच्या मागण्यांसह प्रमुख तीनही मागण्या मान्य केल्या आहेत. रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला…
यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी आपले उपोषण मागे घेतले. काल रात्री मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचा जीआर शासनाने तयार केला होता. यानंतर वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जीआरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपली एकजुट आपण कायम ठेवली. अतिशय संयम आणि शिस्तीने आंदोलन पूर्ण केले. कुठेही गालबोट न लावता हे आंदोलन यशस्वी केले. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करतो. तसेच मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आपले सरकार घेणारे नाही तर देणारे सरकार आहे. मी दिलेला शब्द पाळला. शिवरायांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली, आम्ही दिलेला शब्द पाळतो,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच “आज गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मराठा बांधवांच्या सर्व मागन्या मान्य केल्या आणि केवळ तुमच्या प्रेमापोटी येथे आलो आहे. मराठा समाज म्हणत होता की कुणाच्या ताटातील नको, आमच्या हक्काचे हवे आहे. त्याचप्रमाणे आपण आरक्षण देताना इतर कोणालाही त्रास नको याची काळजी घेतली, यासाठी मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.