मुंबई । Mumbai
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. विधानसभेचा निकाल लागून आज आठ दिवस होऊन गेले.
मात्र, अद्यापही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर केली आहे. पण, तिढा अद्याप संपण्याची चिन्हे नाहीत. त्यातच आता पुन्हा एकदा दिल्लीवारी होणार असल्याच्या बातम्या आल्या. पण त्यातही ट्वीस्ट आला.
एकनाथ शिंदे यांनी आजच्या सर्व बैठका, भेटीगाठी रद्द केल्या. तर दुसरीकडे अजित पवार दिल्लीला जाणार आहेत. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे महायुतीचं नेमकं काय चाललेय? पडद्यामागे काही शिजतेय का? याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव आजच्या सगळ्या बैठका रद्द केल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एकनाथ शिंदे हे सध्या घरीच विश्रांती घेत आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे दुपारी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
अजित पवार हे दिल्लीत नेमकी कोणाची भेटगाठ घेणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असणारे देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील सागर बंगल्यावर आहेत. फडणवीस यांच्या भाजप नेत्यांसोबत खलबतं सुरू आहेत. त्याशिवाय, काही नवनिर्वाचित आमदारही त्यांची भेट घेत आहेत.