संपूर्ण जगात ‘करोना’चे थैमान सुरु आहे. भारतात गेल्या २४ मार्च नंतर या साथीचा फैलाव थांबविण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. दुर्देवाने या साथ रोगाचे सर्वाधिक बळी महाराष्ट्रात आणि ते देखील मुंबई ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद या आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या पट्ट्यात गेले आहेत.
राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून युध्दपातळीवर प्रयत्न चालवले आहेत. लोकांच्या जीविताचे रक्षण करताना असंख्य अडचणी असतानाही सरकारी यंत्रणा रात्रंदिवस झटून कोरोनाचा मुकाबला करण्यात व्यस्त राहिल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून पहिल्या पन्नास दिवसांत जी शक्यता व्यक्त करण्यात आली होती तेवढी म्हणजे पाच लाखांच्या घरात आपल्या राज्यात रूग्ण संख्या वाढू देण्यास अटकाव करण्यात यंत्रणांना यश आले आहे.
मात्र, येत्या जून महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळा म्हटले की मुंबईत अनेकदा निसर्गाचा लॉकडाऊन अनुभवायला मिळतो. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये आणि या पूर्वी २००५ मध्ये जुलै महिन्यात हा अनुभव आला आहे. त्यात /करोना’सारखा आजार मोठ्या प्रमाणात मुंबईत थैमान घालत असताना रुग्णालयांमध्ये पुरेशी व्यवस्था होणार नाही हे लक्षात घेवून मोठ्या प्रमाणात भविष्यात काय होणार या भितीने मुंबईतून माणसांचे लोंढे मोठ्या प्रमाणात देशात आणि राज्यात आपापल्या सुरक्षित ठिकाणी आणि गावाकडे निघाले आहेत.
या लोकांना जाण्याची रेल्वे, बस, विमाने अश्या सेवा नसताना आपल्या खाजगी वाहनातून लाखो लोक जमेल तसे सैरावैरा मुंबईबाहेर निघाले आहेत. हजारो लोकांनी तर पायी गावाकडे जाण्यासाठी हजारो किमी जाण्याची मानसिकता ठेवून मुंबई परिसर रिकामा करण्यास सुरूवात केली आहे. मात्र नागरिकांनी पलायन करू नये सरकारने भविष्यातही या साथीला रोखण्याची संपूर्ण सज्जता केल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले आहे.
राज्य सरकारने मुंबईत विवीध भागात पन्नास हजार अतिरिक्त रूग्णशय्या तयार ठेवण्याचे नियोजन केले आहे. वांद्रे येथे बीकेसी मैदानावर दुस-या टप्प्पयातील कोविड रुग्णालयाचे काम सुरू असून त्यात आयसीयू सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत. मुंबईत एमएमआरडीए लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालय उभारणार आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांवर या ठिकाणी उपचार कण्यात येणार आहे. आयसीयू सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे, मुंबई मनपाच्या अधिका-यांनी म्हटले आहे.
मुंबई मनपा क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. यात मृत्यू होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही जास्त आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत 800 जणांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पश्चिम उपनगर असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पहिल्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालय यशस्वीरित्या तयार केले आहे.
आता दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालयाच्या प्राथमिक कामाला एमएमआरडीएकडून सुरुवात करण्यात आली आहे. या कोव्हीड-19 रुग्णालयामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर, पहिल्या टप्प्यातील रुग्णालय यापूर्वीच महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील रुग्णालयाच्या पुढे हे तयार करण्यात येणार आहे.
या रुग्णालयात 100 आयसीयूची व्यवस्था असलेले बेड, तर उर्वरित 900 बेड हे ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजन असणार आहेत. त्यामुळे या रुग्णालयात गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर देखील उपचार करण्यात येणार आहेत. यापूर्वी, पहिल्या टप्प्यातील रुग्णालय हे पंधरवड्यापेक्षा कमी कालावधीत एमएमआरडीए कडून तयार करण्यात आले होते.
हे रुग्णालय एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनपाकडे सुपूर्द केले. याशिवाय वरळी गोरेगाव येथे नेस्को मैदान, ब्रेबॉर्न क्रीडांगण, वानखेडे स्टेडियम, रेसकोर्स आदी मुंबईत उपलब्ध असणा-या महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्तरूग्णांसाठी खाटा सुसज्ज करण्यावर सरकार आणि मनपासोबत महानगर विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने भर दिला जात आहे. मुंबईत कोरोनाचा आकडा सुमारे लाखभराच्या घरात गेला तरी रूग्णांना उपचारांची व्यवस्था करता यावी असे नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
या शिवाय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सर्व खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा महापालिकेने ताब्यात घेतल्याचे माहिती राज्याचे मंत्री जयंत पाटील सांगितले आहे. कोरोनाच्या काळात आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार खूप काही करीत आहे, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने काही जणांना सरकारवर टीका करायला संधी मिळाली आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबई मनपाने रुग्णालयांच्या माहितीसाठी एक डॅशबोर्ड तयार केले आहे. या डॅशबोर्डवरून लोकांना रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, याची माहिती मिळेल. तसेच खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सरकारी रुग्णालयाच्या खर्चातच खासगी रुग्णालयात उपचार मिळतील. सध्या मुंबईत खाजगी रूग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्याचे प्रकार लक्षात आल्याने सरकारने १९१६ या क्रमांकावर कोणत्या भागात रूग्णाना सेवा मिळेल याची अद्य यावत माहिती देण्याची व्यवस्था केली आहे. या शिवाय रूग्णवाहिकाची संख्या देखील वाढवण्यात येत आहे. प्रसंगी बेस्टच्या ५० बस आणि २०० सुमो गाड्या रूग्णवाहिका म्हणून चालवण्यासाठी तयार केल्या जात आहेत. मुंबईत पहिल्या टप्प्यात हजार रूग्णशय्या तयार झाल्या आहेत. अशी तीन ते चार ठिकाणी व्यवस्था केली जात आहे.
या शिवाय डायलिसीसच्या व्यवस्था देखील केल्या जात आहेत. मुखमंत्री सहायता निधीमधून यासाठी खर्च केला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी कालच केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. राज्यातही होमिओ आणि आयुर्वेदाच्या मदतीने कोरोनाचा उपचार करण्यापासून केरळात यशस्वी झालेल्या प्लाझमा थेरपीबाबतही त्यांनी माहिती घेतली आहे. त्यानुसार मुंबईत आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप सुरू करण्यास सुरूवात झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले. सर्वात महत्वाचे काही पथ्ये पाळली तर कोरोनाला दूर ठेवणे सहज शक्य आहे. त्यामुळे वारंवार हात धुणे, मास्क लावणे, आणि शारिरिक अंतराची मर्यादा पाळून दैनंदिन व्यवहार करण्याची सवय आता सर्वांना लावून घ्यावी लागणार आहे. तर आपण कोरोनाला सहजपणे हरविण्यात यश मिळवू शकतो.
- किशोर आपटे, मुंबई