मुंबई | Mumbai
राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे (Minister Dattatreya Bharane) यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२३-२४ च्या (Shiv Chhatrapati Sports Awards 2023-24) पुरस्कारांची घोषणा केली आहे. शुक्रवारी १८ एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात या पुरस्कारांचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शकुंतला खटावकर (Shakuntala Khatavkar) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पॅरा ऑलिम्पिक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते अदिती स्वामी, ओजस देवतळे, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जायस्वाल, यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने (Awards) गौरवण्यात येणार आहे. एकूण ८९ पुरस्कारांची घोषणा क्रीडा मंत्री भरणे यांनी केली आहे.
दरम्यान, या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे देखील हजर असणार आहेत.
नाशिकच्या पाच जणांचा समावेश
राज्य सरकारचा महत्त्वाचा मानला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नाशिकच्या पाच जणांना जाहीर झाला आहे. त्यामध्ये इंग्लिश खाडी पार केल्याबद्दल तन्वी चव्हाण-देवरे यांना तर ऋतिका रवींद्र गायकवाड यांना सायकलिंग या क्रीडा प्रकारात पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच मृण्मयी साळगांवकर यांना रोइंग, दिलीप महादू गावित यांना पॅरा मैदानी आणि आकाश शिंदे यांना कबड्डी या क्रीडा प्रकारात शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.
शकुंतला खटावकर जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी
राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा आणि त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे. राज्यात वर्ष २००१ पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार दिले जातात. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. १९७९ ते ८२ कालावधीत १०६ राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल आठ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. १९७८ मध्ये केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
पुरस्काराचे स्वरूप काय असते?
जीवन गौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये, शिवछत्रपती पुरस्करासाठी तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून शासनाचा उद्देश राज्यातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणे आणि इतरांनाही क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देणे हा आहे. या क्रीडा पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, मार्गदर्कसाठी जिजामाता पुरस्कार, खेळांडूसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार आणि दिव्यांग खेळांडूसाठी देखील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराने गौरवण्यात येणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र यासह भरीव रक्कमही देण्यात येते.
शिवछत्रपती पुरस्कार कोणाला दिला जातो?
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड त्यांच्या मागील वर्षातील उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश, सातत्य आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांसारख्या निकषांवर आधारित असते. विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंच्या योगदानाला आणि त्यांच्या कठोर परिश्रमाला समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या खेळांचा समावेश असतो.