अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने 67 व्या अजिंक्य व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला बुधवारी शानदार सोहळ्यामध्ये प्रारंभ झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील मल्ल व त्यांचे प्रशिक्षक अशा असंख्य कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली. हलगी संबळ, तुतारीच्या चैतन्यमय वातावरण, मल्ल एकमेकांना भिडले. दरम्यान, प्रारंभी आखाड्याचे पूजन व आराध्य दैवत बजरंगबलीचे पूजन स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्याहस्ते विधिवत पध्दतीने करण्यात आले. सायंकाळी उद्घाटन समारंभ पार पडला.
यावेळी माजी आमदार अरुण जगताप, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पद्मश्री पोपटराव पवार, महेंद्र गंधे, अभय आगरकर, सुभाष लोंढे, अनिल शिंदे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गटातील अजिंक्य कुस्ती स्पर्धेला सायंकाळी सुरूवात झाली. कोल्हापूर, पुणे तालमीत कसरत करीत असलेल्या मल्लांनी हा आखाडा गाजविला. पहिल्या फेरीमध्ये झालेल्या कुस्त्या अत्यंत प्रेक्षणीय व डोळ्याचे पारणे फेडणार्या ठरल्या. त्यातील अनेक कुस्त्या चितपट झाल्या तर काही गुणांकनावर विजेते ठरले. पहिल्या दिवशी माती विभाग व गादी विभाग अशा दोन्ही आखाड्यांमध्ये कुस्त्या रंगल्या. 86 किलो वजनी व 57 किलो वजनी गटांमध्ये पहिल्या फेरीच्या कुस्त्या पार पडल्या.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सुमारे 43 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक वजनी गटामध्ये खेळणारा मल्ल हा पुणे कोल्हापूर, सोलापूर परिसरातील तालमीमध्ये सराव करणारे आहेत. याच मल्लांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे 125 पंच दाखल झाले. हे पंच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा उत्तीर्ण असून, प्रत्येक मल्लाला कसा न्याय मिळेल, याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याचे आखाड्यावर पाहायला मिळाले. कुस्तीच्या आखाड्यामध्ये हलगी ही मल्लाचा उत्साह वाढवणारी असते. खास त्यासाठी अहिल्यानगरचे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार जगताप यांनी विशेष करून कुस्तीच्या आखाड्यामध्ये रंगत आणण्यासाठी कोल्हापूर येथून रणवाद्य हलगी पथक आणले आहे. कुस्तीच्या आखाड्यामध्ये रणवाद्य हलगी पथकाने वेगळीच रंगत आणली. त्या रणवाद्य हलगी पथकामध्ये हालगी, झांज, समावेश आहे. जिगरबाज वाघांचा खेळ म्हणून समजल्या जाणार्या कुस्तीला पाहण्यासाठी अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण भागातून कुस्ती शौकिनांनी पहिल्याच दिवशी भरगच्च हजेरी लावली. सुमारे पंचवीस हजार प्रेक्षक एकाचवेळी कुस्ती पाहू शकतील, अशी व्यवस्था क्रीडा नगरीमध्ये करण्यात आली आहे.