मुंबई (प्रतिनिधी)
जुलै महिन्यात सर्वदूर हजेरी लावणाऱ्या पावसाने ऑगस्टपासून राज्याच्या बहुतांश भागाकडे पाठ फिरवली आहे. १ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, शेवगाव आणि कर्जतसह राज्यातील ११ जिल्ह्यांत तब्बल ३० दिवसांहून अधिक दिवस पावसाचा खंड पडला आहे. तर चार महसुली विभागांमधील ८३ तालुक्यांमध्ये २० दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा दीर्घकालीन पर्जन्यखंड नोंदवला गेला आहे. त्यामुळे या भागात विशेषतः मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असून पावसाची ओढ कायम राहिल्यास खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
कृषी खात्याच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, अडीच मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला कालावधी हा पावसाचा खंड म्हणून ग्राह्य धरला आहे. त्यानुसार अहिल्यानगर आणि पुणे या दोन जिल्ह्यांत सर्वाधिक ३८ दिवस पावसाचा खंड नोंदला आहे. त्या खालोखाल बुलढाणा, नाशिक, सांगली आणि सातारा या चार जिल्ह्यांत ३७ दिवसांचा खंड आहे.
बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांत प्रत्येकी ३४ दिवसांचा तर परभणी जिल्ह्यात ३० दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. याशिवाय धुळे, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांत २६ दिवसांचा, अकोला आणि वाशिममध्ये २३ दिवसांचा, अमरावतीत २२ दिवसांचा, वर्ध्यात २१ तर नागपूरमध्ये २० दिवसांचा खंड नोंदविण्यात आला आहे.
तालुकानिहाय पावसाचा खंड
३८ दिवसांचा खंड कर्जत (जि. अहिल्यानगर), शिरूर
(जि. पुणे)
३७ दिवस : खामगाव (जि, बुलढाणा), नांदगाव, येवला (जि. नाशिक), बारामती, दौंड, पुरंदर (जि. पुणे), आटपाडी
(जि. सांगली), फलटण, माण (जि. सातारा)
३५ दिवस : संगमनेर (जि. अहिल्यानगर), कळवण, देवळाली
(जि. नाशिक)
३४ दिवस : शेवगाव (जि. अहिल्यानगर), गेवराई (जि. बीड), बैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) परांडा (जि. धाराशिव), इंदापूर
(जि. पुणे), माळशिरस (जि. पुणे)
३३ दिवस : सांगोला (जि. सोलापूर)
३१ दिवस: बार्शी, मोहोळ (जि. सोलापूर
पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
खरीप पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः हलक्या जमिनीतील पिकांवर त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस होतो किंवा कसे, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



