मुंबई | Mumbai
उन्हाळ्याने हैराण झालेल्या राज्यातील जनतेला आता मान्सूनपूर्व (Monsoon) सरींमुळे थोडा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. कारण महाराष्ट्रात (Maharashtra) आजपासून (दि.१९ ते २५ मे) दरम्यान पावसाच्या (Rain) सरी कोसळणार असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रामध्ये (Arabian Sea) कर्नाटक किनारपट्टीजवळ गुरुवारी (दि.२२ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे राज्यात आजपासून (दि.१९ मे) पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. कोकण, घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर २१,२२ मे रोजी ३५ ते ४५ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांचा वेग 55 किलोमीटर प्रतितास एवढा होऊ शकतो. त्यामुळे राज्यात सक्रिय हवामान, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस, ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 18, 2025
तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २१ मे पासून अतिमुसळधार पावसासाठी हवामान खात्याकडून (IMD) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात (Maharashtra and Kokan) वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात आज १९ मे रोजी कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
आज नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी ६० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तर पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात (Gangapur Dam) पाच दिवसात दोन टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. गंगापूर धरणात सध्या ४६.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, आता उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ४४.४० टक्के पाणीसाठा होता. यानंतर आता मान्सून वेळेत दाखल झाल्यास नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.