मुंबई | Mumbai
पुण्याच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासांच्या आत अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. जर त्यांचा राजीनामा घेतला नाही तर मी सगळे पुरावे घेऊन दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना जाऊन भेटेन, असेही दमानिया (Anjali Damania) यांनी म्हटले आहे. त्यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर गंभीर आरोप देखील केले.
यावेळी दमानिया म्हणाल्या, “पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अमेडिया कंपनीने (Amedia Company) पुण्यातील वादग्रस्त जमिनीवर डेटा सेंटर सुरु करायचे सांगून स्टॅम्प ड्युटी माफ करुन घेतली आहे. शीतल तेजवानी यांच्याकडून आपण ही ४० एकर जमीन लीजवर घेत आहोत आणि त्याठिकाणी आपल्या डेटा प्रोसेसिंग व मायनिंग सेंटर करायचे आहे, असे सांगून फक्त ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. अमेडिया कंपनीकडून त्यासाठी एलवाय (लेटर ऑफ इंटेंट) घेण्यात आला. १६ जून रोजी केंद्र सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले होते. या व्यवहारात तातडीने हस्तक्षेप करा, असे निर्देश दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही”, असे त्यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या, “अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असताना त्यांच्यावर गुन्हा (Case) दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. शितल तेजवानी, येवले आणि दिग्विजय पाटील यांना तातडीने ताब्यात घेतले पाहिजे. या गैरव्यवहाराची सर्व कागदपत्रे आणि पुरावे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दिली आहेत. जर अजित पवारांनी राजीनामा दिला नाही, तर मी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचेही”, अंजली दमानिया यांनी सांगितले.
तसेच “अमेडिया कंपनीने जमीन विकत घेण्यासाठी अर्ज केला नव्हता, तर कंपनी सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. डेटा सेंटर सुरू करण्यासाठी त्यांनी पत्रक दिले होते. त्यांमुळे हा संपूर्ण प्रकार सरळ सरळ जमीन ढापण्याचा असून, या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली. याप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) बरखास्त करण्यात यावे. या पथकात सहापैकी पाच अधिकारी पुण्याचे आहेत. याप्रकरणासाठी गंभीरपणे एसआयटी पथकाची नियुक्ती झाली पाहिजे. यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती, आयपीएस अधिकारी आणि महसूल विभागातील तज्ज्ञ व्यक्तीचा समावेश असायला हवा”, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली.




