मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
पिके करपलेल्या परंतु ट्रिगर -१ च्या पहिल्या निकषात न बसलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसऱ्या यादीत समावेश केला जाईल. या तालुक्यांना दुष्काळी उपाययोजनांचे लाभ दिले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दुष्काळी तालुक्यांच्या (Taluka) यादीत अनेक तालुक्यांचा समावेश झाला नसल्याचा मुद्दा अनेक मंत्र्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्र्यानी तांत्रिक बाबींमुळे कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली.
यावेळची स्थिती विचित्र आहे. कारण पहिले दोन महिने पाऊस झाला, त्यानंतर दोन महिने पाऊस झाला नाही. अशी स्थिती कधी होत नाही. त्यामुळे अशा तालुक्यांत प्रत्यक्ष गावांगावात जाऊन पाहणी करण्यात येईल. पिकांची करपलेली अवस्था पाहून त्यांना दुष्काळाचा (Drought) फायदा द्यायचा अशी कार्यप्रणाली ठरवण्यात आली आहे. यासंदर्भात उपसमिती पाहणी करेल. ज्या तालुक्यांत खरोखर पिके करपली आहेत, पण पहिल्या यादीत ज्यांचे नाव नाही अशांचा निश्चितच दुसऱ्या यादीत समावेश केला जाईल. त्या तालुक्यांना दुष्काळाचे सर्व फायदे दिले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उपवर्गीकरणावर सर्वसहमती
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबत नेमलेल्या समितीचा अहवाल आला आहे. पण त्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले. वेगवेगळ्या समाजाच्या शिष्टमंडळांनी भेटून अर्ज दिले आहेत. या अर्जांचा विचार करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उपवर्गीकरण करताना कोणत्याही जाती-जातीत तेढ निर्माण न होता तसेच कोणावरही अन्याय न होता उपवर्गीकरण झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. अनुसूचित जातीतील ज्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी सर्वसहमती तयार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी (CM) अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
ठाकरे बंधूंच्या मोर्चाची खिल्ली
लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे कोण आंदोलन करतोय म्हणून आम्ही टीका करणार नाही. परंतु ज्या मुद्दयावर आंदोलन (Protest) करताय तो मुद्दा किती खरा आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण जी उदाहरणे देतो तेही समजून घेतले पाहिजे. यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चाची खिल्ली उडवली.




