मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा या तीन ठिकाणी आज भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचे हे सौम्य धक्के बसले असून याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (National Seismological Center) ट्विट करत दिली आहे. त्यामुळे, सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या भूकंपाची तीव्रता (Earthquake Intensity) २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून ५ किमी खाली होते. सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे पुढे आले आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नसल्याचे समोर आले आहे.
तसेच याआधी मंगळवारी भारतातील (India) पूर्व भागातील कोलकाता, इंफाल येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. २८ मार्च रोजी नेपाळला आलेल्या भूकंपाचे धक्के बिहारच्या सिलीगुडी आणि आसपासच्या परिसरात बसले होते. तर २ एप्रिल रोजी सिक्किमच्या नामची येथे आणि १ एप्रिलला लेह लडाखमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत.
दरम्यान, ३१ मार्च रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग, शी योमी, सिक्किममधील गंगटोकमध्येही जमिनीला हादरे बसले होते. तर २९ मार्च रोजी हरियाणाच्या सोनीपत येथे दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी २.३ रिश्टर स्केल भूकंपाने जमीन (Land) हादरली होती.