मुंबई | Mumbai
राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन (Shalinitai Patil Passes Away) झाले आहे. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी राज्याचे मंत्रीपद देखील भूषविले होते. सांगलीचे खासदार विशाल पाटील (MP Vishal Patil) यांच्या त्या आजी होत्या. शालिनीताई पाटील यांच्या पार्थिवावर साताऱ्यातील (Satara) कोरेगाव या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शालिनीताई पाटील या आजारी होत्या. त्यामुळे त्या मुंबईतील (Mumbai) घरीच राहत होत्या. शालिनीताई यांनी वसंतदादा पाटील यांना खबीर साथ दिली होती. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्रातून दुख: व्यक्त केले जात आहे.
शालिनाताई पाटील यांचा परिचय
राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या शालिनीताई पाटील या पत्नी होत्या. तर सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्या आजी होत्या.वसंतदादा पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. त्यांनी १९८० च्या दशकात काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रीपद भूषविले होते. तर १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात त्यांची मोलाची भूमिका असल्याचे बोलले जाते. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून १९९९ ते २००९ या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९९० आणि १९९५ साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.




