मुंबई | Mumbai
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयच्या कोठडीत असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना मुंबईतील सत्र न्यायालयाकडून (Mumbai Seassion Court) जामीन मंजूर करण्यात आला होता. साडेपाच वर्षांपासून अधिक काळ तुरुंगात असल्याने दीर्घ कारावासाच्या आधारावर त्यांना हा जामीन मंजूर झाला होता. मात्र जामीन रद्द करावा, यासाठी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरुवातीला हा जामीन रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर आता सचिन वाझे यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सचिन वाझे यांच्या जामिनाला ७ ऑक्टोंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे वाझे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे आरोपी असून,ते पाच वर्षांपासून तुरुंगात आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान एनआयएच्या (NIA) वतीने ॲड. अनिल सिंग यांनी बाजू मांडताना म्हटले की, सचिन वाझे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे दहशतवादी कृत्य आणि हत्येचे गंभीर आरोप आहेत. तसेच ज्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती, त्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेशी संबंधित ३ सुरक्षा अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्यांदा जामीनाला होकार नंतर नकार
मुंबई सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांना जामीन मंजूर केल्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने याचिका दाखल करत जामीन आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. या याचिकेवर सुरुवातीला न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी अपेक्षित होती; मात्र त्यांनी प्रकरणातून स्वतःला बाजूला करत सुनावणीस नकार दिला. त्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली असता त्यांच्या खंडपीठाने सुनावणीस असमर्थता दर्शवली होती. यानंतर एनआयएने हे प्रकरण तातडीने मुख्य न्यायमूर्तींसमोर मांडले असता त्यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठाकडे वर्ग केले. त्यानंतर आज यावर सुनावणी झाली असता सचिन वाझेंच्या जामीन आदेशाला ७ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली. या आदेशाची माहिती कारागृह प्रशासनाला देण्यात आली असून, वाझेंना जामिनावर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एक संशयित बेवारस सोडलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र आढळले होते. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या दोन्ही प्रकरणांत बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण १० आरोपींविरोधात पाच वर्षांनी आरोप निश्चित झाले होते.




