नवी दिल्ली | New Delhi
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात (Local Body Election) सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर (दि. २५ फेब्रुवारी) रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने (Court) याप्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार (दि. ४ मार्च) रोजी होईल,असे म्हटले होते. त्यामुळे राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर आज (दि.४ मार्च) रोजी याप्रकरणी सुनावणी झाली असता पुन्हा एकदा संस्थेच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.
आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर (Petition) फक्त दोन मिनिटे सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दोन्ही बाजूंच्या वकिलांवर संतापल्याचे दिसून आले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पावसाळ्याआधी (Monsoon) होण्याची शक्यता मावळली आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर न झाल्याने राज्यातील २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. तसेच, राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षाचे मेळावे व बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिले जात आहे. परंतु, आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.