मुंबई | Mumbai
१० वीच्या परीक्षेला आज सुरुवात झाली अन् लगेचच जालना (Jalna) येथे कॉपी व पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी परीक्षा केंद्र (Exam Centre) रद्द करून कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाने सर्व विभागाच्या (Department) बैठका घेतल्या आहेत. तसेच विद्यार्थी व सर्व विभागाला दबाव न घेता परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन देखील केले आहे. राज्यात काही ठिकाणी कॉपी झाली, कॉपी पुरवण्याचे प्रकार समोर आले आहेत, तशा चित्रफितीही प्रसार माध्यमातून पुढे आल्या आहेत. याबाबत निश्चितपणे गंभीर दखल शासन स्तरावर घेतली आहे, असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटले.
दरम्यान, यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी (Copy) झाली ते केंद्र रद्द करण्यात आले आहे. त्यात बदल करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली आहे त्या केंद्रावरील प्रशासनदेखील बदलण्यात आले आहे. यापुढेही कॉपीसंदर्भान कठोर कारवाई (Action) केली जाईल, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी व्हिडिओ शूटिंग, पोलीस गस्ती पथक, बैठे पथक आदी यंत्रणा कार्यरत आहे. असे असतानाही परीक्षेत कॉपी प्रकरणांना आळा बसलेला नाही. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रांवर पेपर फुटल्याची चर्चा आहे. तसेच मंठा तालुक्यातील तळणी परीक्षा केंद्रावरही गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा समोर आल्याने तातडीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रांवर शिक्षणाधिकारी यांना पाठवले. परीक्षा केंद्रांवर तपासणी सुरू असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
नाशकात कॉपी नाही
नाशिक विभागात पहिलाच मराठीचा पेपर विद्यार्थ्यांनी उत्साहात सोडवला. विभागात एकही कॉपीचा प्रकार आढळला नाही. नाशिक विभागातून (Nashik Division) दोन लाख दोन हजार ६२७ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले. पोलीस प्रशासनाने कॉपीविरोधात कडक उपाययोजना केल्या होत्या.