मुंबई | Mumbai
नीट पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणजेच ‘मास्टरमाईंड’ लातूरचा माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी (P.V.Kulkarni) याला शुक्रवारी रात्री पुण्यातून अटक केली. आज (शनिवारी) त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अतिशय गोपनीय अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी कुलकर्णी संबंधित असल्याने शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यानंतर आता पी. व्ही. कुलकर्णीची कुंडली समोर आली आहे.
कोण आहे प्रा. पी. व्ही. कुलकर्णी?
पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा (Chemistry) प्राध्यापक असून, त्यांनी लातूर (Latur) येथील नामांकित ‘दयानंद महाविद्यालयात’ तब्बल २८ वर्षे अध्यापनाचे काम केले आहे. ५ ते ६ वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले होते.लातूरच्या बारावी विज्ञान शाखा आणि मेडिकल प्रवेश परीक्षांच्या (NEET) मार्गदर्शनासाठी त्याचा मोठा दबदबा असल्याचे बोलले जाते. कुलकर्णीचे लातूरमधील कैलास नगर येथे निवासस्थान असून, त्याचे कुटुंबीय पुण्यात (Pune) राहत होते. त्यामुळे त्यांचे लातूरमधील वास्तव्य कमी झाले होते. निवृत्तीनंतर ते पुण्यात राहूनच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
पेपर कसा फोडला?
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, अटक (Arrested) करण्यात आलेला आरोपी पी.व्ही. कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा (रसायनशास्त्र) व्याख्याता असून, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या वतीने परीक्षा प्रक्रियेत त्याचा सहभाग होता. या कामामुळे त्याला प्रश्नपत्रिकांची उपलब्धता झाली होती. त्याने या संधीचा गैरफायदा घेत एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना एकत्र केले. यासाठी त्याला पुण्यातील बिबेवाडी परिसरात सुखसागरनगर येथे राहणाऱ्या ब्युटी पार्लर चालक मनिषा वाघमारे या दुसऱ्या आरोपीने मदत केली, तिला सीबीआयने १४ मे रोजीच अटक केली होती.
पेपर फोडण्याची कार्यपद्धती कशी होती?
कुलकर्णीने पुण्यात आपल्या राहत्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी ‘विशेष कोचिंग क्लासेस’ आयोजित केले होते. या वर्गांमध्ये त्याने प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे विद्यार्थ्यांना तोंडी सांगितली. विद्यार्थ्यांनी ही उत्तरे आपल्या वहीत लिखित स्वरूपात लिहून घेतली होती. धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थ्यांनी वहीत लिहिलेले हे प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळले आहेत. या बदल्यात मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा संशय आहे.




