मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरत आहे. प्रशांत कोरटकर कोलकातामार्गे दुबईला फरार झाल्याची चर्चा असून याबाबत त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर पोलीस आणि नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रशांत कोरटकरच्या पत्नीची (Wife) पोलिसांनी (Police) नुकतीच चौकशी केली होती. त्यावेळी तिने पती चंद्रपूरला गेल्याचे सांगितले होते.त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचे पथक चंद्रपूरला रवाना झाले होते. परंतु, त्याचवेळी कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. परंतु, त्याचा तो जुना फोटो असल्याचा दावा केला जात आहे.
दुसरीकडे प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अटकेच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षणास तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी ठेवली आहे. यामुळे आता सोमवारच्या सुनावणीकडे (Hearing) सर्वांचे लक्ष लागून आहे.
संजय राऊतांची टीका
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा फोटो व्हायरल झाला आहे. जो पाहून तो दुबईमध्ये असल्याचा दावा केला जाता आहे. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “प्रशांत कोरटकर हा त्यांचाच नागपूरचा माणूस आहे. आता तो पळून गेला की नाही हे सांगतील. उद्या आम्ही म्हणायचो पळून गेला आणि तो भाजपच्या कार्यालयात, मंत्र्यांच्या बंगल्यात किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. भाजपच्या राजवटीमध्ये काहीही होऊ शकतं, जर खरोखर कोरटकर पळून गेला असेल तर गृहखात्याच्या मदतीशिवाय तो पलायन करू शकत नाही. फडणवीसांचे पोलीस इतके सक्षम आहेत, आरोपींना पकडतात सरकारच्या आदेशाने सोडून देतात”, असे संजय राऊत यांनी म्हटले.
अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर
अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूर वरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे”, असे ते म्हणाले.
कोरटकर देशाबाहेर दुबईला पळून गेला की पळवून लावला? रोहित पवारांचा सवाल
“छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा कोरटकर देशाबाहेर दुबईला पळून गेला की पळवून लावला ? रोल्स रॉयल फिरवणारा हा चिल्लर कोरटकर प्रायव्हेट जेट ने गेला की साध्या विमानाने गेला? राज्यकर्त्यांचा मित्र असल्याने सगळ्या यंत्रणा कोरटकरच्या घरगडी असल्यासारख्या वागल्या हे आता स्पष्ट झाले आहे. एका चिल्लर माणसाला वाचवण्यासाठी गृहखात्याने केलेला थिल्लरपणा आता उघड झाला असून सरकारने यावर तत्काळ स्पष्टीकरण द्यावे”, असे रोहित पवार म्हणाले.