मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे (Murder Case) बीड (Beed News) जिल्हा चर्चेत आला आहे. देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक (Arrested) केली आहे. त्यामुळे मुंडे यांचा पाय खोलात गेला आहे. अशातच आता या प्रकरणात बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी एक व्हिडीओ शेअर करत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबाबत अतिशय धक्कादायक दावा केला आहे.
रणजित कासले (Ranjit Kasale) यांनी काल (सोमवारी) एक व्हिडीओ शेअर करत वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर होती, असा दावा केला होता. त्यामध्ये कासले यांनी आता धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला होता. कराड त्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढणार होता. त्यामुळे ते खुनाचा आरोप सहआरोपी झाले असते असा धक्कादायक दावा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे धनंजय मुंडेंना पाठिंबा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुरावे दाबण्यात आल्याने धनंजय मुंडे आता सहआरोपी होणार नाहीत असा दावाही रणजीत कासले यांनी केला आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
मला कराडच्या एन्काऊंटरची ऑफर – कासले
रणजीत कासले यांनी काल एक व्हिडीओ शेअर करत मोठा दावा केला होता. ते म्हणाले होते की, ‘फेक एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो. ज्यावेळी मला वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती पण मी नकार दिला. एन्काऊंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते, १०, २०, ५० कोटी इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती. मी मोठेपणा सांगत नाही. परंतु, फेक एन्काऊंटर करताना ४ लोकांची टीम असते, त्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह सचिवांची गुप्त बैठक होते. त्यात काय करायचे हे ठरते. मग त्यानंतर ५-६ विश्वासू लोकांची टीम बनते, असा धक्कादायक खुलासाही कासले यांनी व्हिडिओमध्ये केला होता.