मुंबई | Mumbai
महायुती सरकारच्या (Mahayuti Government) पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार असून सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष या पुरवणी मागण्यांवर असणार आहे. दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष (NCPSP) आक्रमक पाहायला मिळाला आहे. अशातच आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारवर ‘दलालीची दलाल’ पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे उघडकीस आणले आहे.
आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारच्या ११ घोटाळ्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये रुग्णवाहिका घोटाळा, दूध घोटाळा, भोजनपुरवठा घोटाळा, एमएसआईडीसी घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा, एमआयडीसी जमीन घोटाळा, आनंदाचा शिधा घोटाळा, पुणे रिंग रोड घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, एमएसआरडीसी घोटाळा, रक्तपेढी परवानगी घोटाळ्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं महायुती सरकारचे सूत्र असून दलालीच्या पैशातून (Money) महाराष्ट्राचा (Maharashtra) स्वाभिमान विकत घेण्याची मनसुबे असल्याचा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की,”महाराष्ट्राला दलालीच्या दलदलीत अडकून पाहणाऱ्या सत्ताधारी दलालांचा खरा चेहरा समोर आणणे गरजेचं होतं आणि ते काम आम्ही प्रामाणिकपणे केले आणि भविष्यातील करत राहणार आहोत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी या प्रयत्नांना महाराष्ट्रातील तमाम जनतेची साथ मिळणे गरजेचे आहे. मराठी माणूस स्वाभिमानी असल्याने तशी साथ निश्चितच मिळेल असा विश्वास आहे. आपण सर्वजण मिळून महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या आणि महाराष्ट्र लुटून खाणाऱ्या दलालांना त्यांनीच करून ठेवलेल्या दलदलीत गाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही या निर्धाराने विधानसभा निवडणुकीला (Vidhansabha Election) समोर जाऊ”, असेही त्यांनी म्हटले.
तसेच “सत्तेत असलेल्या नेत्यांनी काल पत्रकार परिषद (Press Conference) घेतली आणि या पत्रकार परिषदेत आमच्या सगळ्या गोष्टी किती चांगल्या हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण कालची पत्रकार परिषद म्हणजे गंमतीजमती जास्त होत्या”, अशी टीकाही रोहित पवारांनी सरकारवर केली. तर सरकार (Government) खोटे बोलत असून महाराष्ट्रात ५३१ रूपये टू व्हिलर नंबर प्लेटला लागतात पण गुजरातमध्ये (Gujarat) टू व्हिलर नंबर प्लेटसाठी १५० रूपये घेतात”, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.