मुंबई | Mumbai
राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील ७५ टक्के भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात तीव्र दुष्काळाची सावली असून, तब्बल २६५ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. विशेषतः मराठवाड्यात परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawa) हे स्वत: लवकरच दुष्काळी भागाचा दौरा (Drought Area) करणार आहेत. त्याआधी त्यांनी सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आणि पोकळ असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ भक्कम आधाराची गरज आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त करत सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे.
आज (सोमवारी) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची (NCP Sharad Pawar) मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत सध्या राज्यातील स्थिती तसेच दुष्काळ निवारणासाठी काय करता येईल? यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. दरम्यान बैठक घेण्याआधी शरद पवारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी सरकारकडे एकूण १७ उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी सरकार दुष्काळ निवारणासाठी तसेच शेतकऱ्यांच्या (Farmer) मदतीसाठी कसे अपुरे पडत आहे, याबाबतची माहिती दिली.
राष्ट्रवादीचे नेते पुढील तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर
ते म्हणाले की, “दुष्काळाची खरी परिस्थिती आणि शेती पिकांचे झालेले नुकसान जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते पुढील तीन दिवस राज्याचा दौरा करणार आहेत. हा दौरा आटपल्यानंतर नुकसानीचा सविस्तर अहवाल समोर आणला जाईल.सरकारने जारी केलेली मदत ही अपुरी असून, यातून शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही. सध्या शेतकरी संकटात असल्याने त्याला भक्कम साथ हवी आहे, असे शरद पवारांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना एक नवा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी काय काय करता येईल, याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सरकार नवे निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे, असेही शरद पवारांनी म्हटले. दरम्यान विरोधी पक्षांकडून दुष्काळग्रस्त शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांना तातडीने थेट आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील मुद्द्यांवर राज्य सरकार काय पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यावरही केली भूमिका स्पष्ट
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांवरही आज शरद पवारांनी भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “आम्ही कोणासोबत जाणार नाही, कोणाला यायचे असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे”, असे म्हटले. त्यामुळे आता शरद पवारांच्या या विधानावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.




