मुंबई | Mumbai
राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता बीडचे सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यांनी या व्हिडीओत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बीडचे निलंबित पोलीस अधिकारी (Suspended Police Officer) रणजीत कासले यांनी व्हिडीओमध्ये असा दावा केला आहे की, “मी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची बातमी पाहिली. यात कोर्टाने ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं म्हटले. एसआयटी बसवून काही उपयोग होणार नाही. जर चौकशी करायची असेलच तर केंद्राची यंत्रणा बसवा, मग त्यातून सत्य बाहेर पडेल. बनावट एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो. ज्यावेळी मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिली होती पण मी नकार दिला. एन्काऊंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते, १०, २०, ५० कोटी इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतो. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती” असं त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की. “मी मोठेपणा सांगत नाही. परंतु फेक एन्काऊंटर करताना ४ लोकांची टीम असते, त्यात मुख्यमंत्री (CM) दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह सचिवांची गुप्त बैठक होते. त्यात काय करायचे हे ठरते. मग त्यानंतर ५-६ विश्वासू लोकांची टीम बनते. ती संबंधित ठिकाणी जाते, म्हणजे अक्षय शिंदे याचे झाले तसे, तिथे १ अधिकारी, २-३ अंमलदार अशी आणखी एक टीम तयार केली जाते. त्यांना ५,१०, १५ कोटी मोठी रक्कम एकाच वेळी दिली जाते. त्यानंतर या घटनेची चौकशी आपलेच सरकार करेल, त्यातून तुम्हाला मुक्त करू अशी वचने दिली जातात अशाप्रकारे बनावट एन्काऊंटर घडवून आणले जातात” असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे.
दरम्यान, रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून केले आहेत. त्यानंतर आता वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच याआधी कासले यांनी गुजरातमध्ये जाऊन एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे समोर आले होते. हे खंडणीचे पैसे घेतानाचा कासले यांचा व्हिडिओ देखील समोर आला होता. याशिवाय काही फोटोग्राफही समोर आले होते,ज्यात बंदूक ठेवून दहशत निर्माण करत असल्याचे दिसते. या प्रकारानंतर कासले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.