मुंबई | Mumbai
परभणी शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका अज्ञाताने मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परभणी शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी आज परभणी बंदची (Parbhani Bandh) हाक दिली होती. मात्र, या परभणी बंदच्या आंदोलनाला हिसंक वळण लागले असून पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या परभणी बंदला लोकांनी चांगलाच प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच शहरातील अनेक भागातील बाजारपेठा, दुकाने, शाळा-महाविद्यालयात शुकशुकाट दिसला. आजच्या बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्याच्या अनेक भागातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच परभणी बाजारपेठ सकाळपासून ठप्प होती. पंरतु, बंद दरम्यान अचानकपणे जमाव आक्रमक झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली. तसेच वाहनांवर देखील दगडफेक (Stone Throwing) केली.
यावेळी संतप्त झालेल्या जमावाने ताडकळस येथे धानोरा टी पॉईंट पोलिस स्टेशनच्या समोर निषेध रॅली काढत रस्तारोको केला. तसेच परभणी शहरातील रेल्वे स्टेशन रोडबाहेर ठेवलेले पाईप ३ ठिकाणी पेटवून दिले. यानंतर या भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. यावेळी पोलिस आणि जमाव आमनसामने आला असता पोलिसांकडून जमावाला हटविण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तर काही ठिकाणी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर जमावाकडून पोलिसांवर (Police) दगडफेक करण्यात आली. त्यामुळे परभणीमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली असून पोलिसांचा ताफा वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, परभणीतील या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट करत सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, “बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोह चले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा”, असे आवाहन त्यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे. तसेच येत्या २४ तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.