मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्यातील खासगी प्रवासी बस (Private Bus) वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सच्या (Mobile Apps) माध्यमातून प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारने (State Government) कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील तक्रारींचे निराकरण तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज दिले. त्यामुळे खासगी बस वाहतूकदारांकडून होणाऱ्या लुटीला चाप बसणार आहे.
सरनाईक यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात (Mantralaya) झालेल्या बैठकीत खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. सह परिवहन आयुक्तांची समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे आणि प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचविण्याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून सुचविलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या अनधिकृत ॲप्सच्या माध्यमातून प्रवाशांचे बुकिंग करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची फसवणूक (Fraud) खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा सरनाईक यांनी यावेळी दिला.
मराठी भाषेची अंमलबजावणी करणार
राज्यातील बसस्थानकांवरील संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. प्रत्येक बसस्थानकावर प्रवासी सुविधांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देतानाच, परिवहन विभागाने नावे बदललेल्या गावांबाबत आणि व्याकरणदृष्ट्या अचूक मराठी भाषेच्या वापराबाबत परिपत्रक जारी करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना सरनाईक यांनी केली.
एसटी स्थानकातील स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना
दरम्यान, एसटी बस आणि बसस्थानकांच्या अस्वच्छतेबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बसस्थानकांचा कायापालट आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात असून येत्या १ जूनपासून महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी यावेळी जाहीर केले. प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर तसेच सुराज्य अभियान संघटनेचे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे आणि सुनील हनवट उपस्थित होते.





