Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : "राम मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू…"; रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरेंची सडकून...

Uddhav Thackeray : “राम मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू…”; रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरेंची सडकून टीका, नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Shri Ram Temple) झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात आज (रविवार) मुंबईतील (Mumbai) दादर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात आले. यावेळी दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisement -

आपण कडवट हिंदू आहोत, पण मूर्ख नाही – उद्धव ठाकरे

यावेळी दादर (Dadar) येथील उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या दानाची चोरी करणाऱ्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “आपण कट्टर, कडवट हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे-भाबडे आहोत, पण मूर्ख नाहीत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन कोणी मंदिर लुटत असेल तर ‘अब हिंदू माफ नही करेगा’. देशाची सत्ता मिळवण्यासाठी ‘जय श्रीराम’ आणि ‘मंदिर वही बनायेंगे’ अशा घोषणा दिल्या गेल्या. मात्र, राम मंदिरासाठी शिवसैनिकांनी जेवढे काम केले, तितके काम दुसऱ्या कोणीही केलेले नाही”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

बाबरी ते मुंबई दंगल अन् बाळासाहेबांच्या योगदानाचा उल्लेख

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आंदोलनातील शिवसैनिकांच्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचा प्रामुख्याने उल्लेख केला. ते म्हणाले की, “शिलापूजन, रथयात्रा आणि अयोध्येतील कारसेवेत शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेक कारसेवकांनी आपले रक्त सांडले, अनेकांचे जीव गेले. बाबरीच्या घटनेनंतर मुंबईने दंगली आणि बॉम्बस्फोटांचा भीषण काळ भोगला. त्या कठीण काळात हिंदू आक्रमित आणि भयग्रस्त असताना, त्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकच मर्द नेता होता, तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांनीच हिंदूंच्या हातात शिवसेनेचा भगवा दिला. ज्या व्यक्तीला पंतप्रधान करण्यासाठी आपण १२ वर्षे मेहनत केली, त्यांनीच आता शिवसेनेला संपवण्यासाठी ‘अफजलखानी विडा’ उचलला आहे. त्यांना हिंदुत्वाचा केवळ गैरफायदा घ्यायचा आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना समोर उभे राहून निधड्या छातीने प्रश्न विचारण्याची धमक फक्त शिवसेनेमध्येच आहे, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

रामरक्षा आणि हनुमान चालिसा पठण

या आंदोलनाची सुरुवात भर पावसात ‘रामरक्षा आरती’ आणि हनुमान चालिसा पठणाने झाली. स्वतः उद्धव ठाकरे हे देखील कोणत्याही छत्रीचा आधार न घेता चिंब पावसात उभे होते. भिजलेल्या अवस्थेतच त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या निधीत गैरव्यवहार करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी करत समस्त हिंदूंना जागे राहण्याचे आवाहन केले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.

भर पावसात शिवसैनिकांचा महासागर

मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही आंदोलनाचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. हातात छत्र्या, अंगावर रेनकोट, डोक्यावर भगव्या टोप्या आणि गळ्यात भगवे गमछे परिधान करून हजारो शिवसैनिकांनी दादर परिसरात गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

Nashik News : सप्तशृंगी गडावरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक निर्बंधांत बदल

0
नाशिक | Nashik सप्तशृंगी गड (Saptshrungi Gad) येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी (Crowd) आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने वाहन प्रवेशबंदीच्या कालावधीत...