पुणे | Pune
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (Maharashtra Olympic Association) अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये गेल्या वर्षी मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी शड्डू ठोकला होता. मात्र, ऐनवेळी दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची अध्यक्षपदी तर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती.
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर अखेर भाजपचे नेते तथा केंद्रीय नागरी विमानवाहू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या बालेवाडी (Balewadi) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या जाण्यानंतर हे पद काही काळ रिक्त होते.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानंतर त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. दरम्यान, पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, ऑलिंपिक असोसिएशनच्या (Olympic Association) अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्या नुकत्याच खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून सदस्य झाल्या असल्याने अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आणि मोहोळ यांची निवड निश्चित झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सलग चारवेळा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले आहे.





