Saturday, July 27, 2024
Homeनगरमहाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या हाती मोबाईल Mobile

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या हाती मोबाईल Mobile

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

अवघे जग माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आहे. त्यात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी एक मोबाईल जोडणी उपलब्ध आहेत. एक लाख लोकसंख्येमागे 99 हजार 689 भ्रमणध्वनी आणि 3 हजार 667 दूरध्वनीच्या जोडण्या उपलब्ध आहेत. राज्यात सर्वाधिक ग्राहक रिलायन्स जिओनी मिळवले असून सर्वात कमी ग्राहक भारत सरकारच्या एम.टी.एन.एल आणि बी.एस.एन.एल कंपनीने मिळवले आहेत. या दोन्ही कंपन्यांचे ग्राहक मोठ्या वेगाने कमी होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रामध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये रिलायन्स जिओनी 5 कोटी 3 लाख ग्राहक मिळवले आहेत. त्या खालोखाल वोडाफोन आयडिया या कंपनीने 3 कोटी 77 लाख, भारती कंपनीने 2 कोटी 99 लाख ग्राहक मिळवले आहेत. बी.एस.एन.एल ने 63 लाख 87 हजार एम.टी एन.एलने 10 लाख 78 हजार ग्राहक मिळवले आहेत. राज्यात गेल्या तीन वर्षाचा आढावा लक्षात घेता दूरध्वनीची संख्याही वाढत चालली आहे. 2020-21 मध्ये राज्यामध्ये 43 लाख 70 हजार दूरध्वनी ग्राहक होते. तर 2022-23 मध्ये 46 लाख 20 हजार दूरध्वनी ग्राहक झाले आहेत. सुमारे 3 लाख 3 हजार ग्राहक दोन वर्षांमध्ये वाढले आहेत.

दहा कोटी इंटरनेट ग्राहक

जगाच्या पाठीवर सर्वाधिक आंतरजाल वापरणारे ग्राहक भारतात असल्याचे सांगण्यात येते. भारतातही 2022 च्या सर्वेक्षणानुसार एकट्या महाराष्ट्रात 10 कोटी 6 हजार ग्राहक आंतरजाल सुविधा वापरत असल्याचे बाब समोर आली आहे. लोकसंख्येचा विचार करता सुमारे 90 टक्के लोकसंख्या ही राज्यामध्ये आंतरजाल जोडणी वापरत आहे हे विशेष. इतक्या मोठ्या प्रमाणावर आंतरजाल जोडणी वापरणारे ग्राहक असल्यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांच्या वापरात समाज माध्यमांचे प्रमाणे अधिक राहिले आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, एक्स यासारख्या विविध समाज माध्यमांचा उपयोग करण्यातही महाराष्ट्राचे आघाडी कायम आहे.

दूरध्वनीसाठी सरकारी कंपन्यांना पसंती

राज्यामध्ये एम.टी.एन.एल कंपनीचे 13 लाख 36 हजार व बी.एस.एन.एल कंपनीचे 6 लाख 42 हजार दूरध्वनी ग्राहक आहेत. भारती कंपनीचे 8 लाख 23 हजार, टाटाचे 6 लाख 86 हजार, वोडाफोनचे 2 लाख, जिओचे 8 लाख 75 हजार आणि रिलायन्स कॉमचे अवघे 57 हजार ग्राहक दूरध्वनी संच वापरत आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 46 लाख 20 हजार दूरध्वनी ग्राहक असून भ्रमणध्वनीचा वापर करणार्‍यांची संख्या 12 कोटी 55 लाख 87 हजार इतकी आहे. याचा सरळ अर्थ लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शंभर टक्के लोकसंख्या भ्रमणध्वनीचा वापर करत असल्याचे बाब समोर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या