मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
रायगड आणि नाशिक जिल्हा (Raigad and Nashik District) पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) धुसफूस सुरू असताना भाजपने (BJP) बुधवारी १७ जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्कमंत्री नियुक्त केल्याचे भाजपने म्हटले असले तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पालकमंत्री असलेल्या ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यात भाजपने संपर्कमंत्री दिले आहेत. शिंदे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांची ठाणे जिल्ह्यासाठी तर कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांची मुंबई शहर जिल्ह्यासाठी नेमणूक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्यात अनुक्रमे चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे हे भाजपचे जिल्हा संपर्कमंत्री असणार आहेत.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात (NCP and Shivsena) जबरदस्त रस्सीखेच असताना भाजपने संपर्कमंत्री म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यावर सोपवली आहे. तर नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदाला (Guardianship) स्थगिती मिळाल्याने सध्या या पदापासून वंचित असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे संपर्कमंत्री म्हणून जळगाव जिल्ह्याची धुरा देण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने जिल्हा संपर्कमंत्री म्हणून नितेश राणे यांना तर नंदुरबार जिल्ह्यात जयकुमार रावल यांची नियुक्ती केली आहे.
असे आहेत संपर्कमंत्री
गोंदिया – डॉ. पंकज भोयर
बुलढाणा – आकाश फुंडकर
यवतमाळ – अशोक उईके
वाशीम – राधाकृष्ण विखे पाटील
छ. संभाजीनगर- अतुल सावे
बीड – पंकजा मुंडे
धाराशिव – जयकुमार गोरे
हिंगोली – मेघना बोर्डिकर
जळगाव – गिरीश महाजन
नंदुरबार- जयकुमार रावल
मुंबई शहर – मंगलप्रभात लोढा
ठाणे – गणेश नाईक
रायगड – आशिष शेलार
रत्नागिरी – नितेश राणे
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कोल्हापूर – माधुरी मिसाळ
पुणे – चंद्रकांत पाटील