नाशिक | Nashik
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) २३७ जागांवर विजय मिळविला आहे. यात भाजपने १३२, शिवसेनेला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल लागूनही अद्याप महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले. ते नाशिकमध्ये (Nashik) माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “१३२ आमदार (MLA) निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहून काम करेन असं सांगितलं होतं. पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानला. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाही. मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं. शक्ती मागे उभी केली आहे. त्यामुळे त्यांना काही लोक टार्गेट करत आहेत. याचं कारण तेच आहे”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
तसेच महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) ईव्हीएम मशीन बाबत केल्या जात असलेल्या आरोपांवर बोलतांना भुजबळ म्हणाले की, मला ५६ ते ५७ हजाराचे लीड होते. माझे मतदान १ लाखावर जायला हवे होते. जरांगेंमुळे एका मोठ्या वर्गाचे मतदान मिळाले नाही. ईव्हीएममध्ये गडबड असती तर माझे मताधिक्य वाढले असते ते कमी का झाले? लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते, काहीतरी कारणे शोधावी लागतात, कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडावे लागते, असे म्हणत छगन भुजबळ यांनी विरोधकांना टोला लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा