मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांनी मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेत राजकीय युतीची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला मुंबईपासून आणि मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले. तर राज ठाकरेंनी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार,असे म्हणत मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीची टिंगल उडवत हल्लाबोल केला आहे.
हे देखील वाचा : Thackeray Brothers Alliance : मनसे-शिवसेना युतीची राज ठाकरेंकडून घोषणा; दोन्ही बंधू नेमकं काय म्हणाले?
यावेळी ते म्हणाले, “ठाकरे बंधू (Thackeray Brothers) एक झाल्याचा आनंद आहे पण त्यांचा राजकीय दृष्ट्या काहीही फरक पडणार नाही. दोन्ही पक्ष आपले अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र आले आहेत. ते फक्त भावनिक आवाहन करत असतात. मुंबईकर मराठी माणसाला बाहेर काढले. अमराठींवर हल्ले केले, त्यामुळे त्यांच्या मागे कोणीही नाही. या निवडणुकीत आणखी चार जणांना सोबत घेतले तरी काही होणार नाही. ठाकरे यांनी सातत्याने मराठी माणसाचा विश्वासघात केला. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला आहे. त्यामुळे यंदा मुंबईची जनता त्यांच्या भावनिक आवाहनाला भुलणार नाही. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Thackeray Brothers Alliance : भाऊबंदकीला स्वल्पविराम; ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा
पुढे ते म्हणाले, ” आमचे हिंदुत्व राजकारणापुरते नाही किंवा आम्ही मतांसाठी हिरवी शाल पांघरलेली नाही.आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत. मुंबई आणि महाराष्ट्र (Maharashtra) हिंदुत्ववादी असून, जे लोक लांगूलचालन करतील त्यांचे काय होते हे बघितले आहे. आमचे हिंदुत्व व्यापक असून, तडजोड करणारे नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी आमच्या हिंदुत्वावर शंका घेऊ नये. ठाकरे बंधु म्हणजे मराठीचा स्वाभिमान नाही. ते विकासावर बोलत नाहीत, त्यांना मराठी माणसांचा आणि मिठी नदीचा हिशेब द्यावा लागणार आहे. त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागणार असून, हा प्रीतीसंगम नव्हे तर भीतीसंगम आहे”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. तसेच महायुतीची महापालिका निवडणुकांच्या जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच घोषणा करू, असंही त्यांनी सांगितलं.
हे देखील वाचा : Video : ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांना अभिवादन; राज आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय स्मृतिस्थळावर उपस्थित
ठाकरे बंधूंच्या युतीची उडवली टिंगल
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मी टीव्ही बघतो होतो त्यावेळी काही माध्यमे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा कार्यक्रम असा दाखवत होती की जणूकाही रशिया युक्रेनची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की निघाले, तिकडून पुतीन निघाले आणि ही युती झाली. कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवायला जे काही करावे लागते तेच हे दोन्ही पक्ष करत आहेत. या दोन्ही पक्षांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही युती केली असून, त्यापलीकडे या सगळ्याचा फार काही अन्वयार्थ काढण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची टिंगल उडवली.




