मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अजूनही मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय झालेला नाही. महायुतीत मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यानंतर आज शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन गेलो. अडीच वर्षांच्या काळात पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरलो. या अडीच वर्षाच्या काळात मोदी-शहा खंबीरपणे मागे उभे राहिले. या काळात सर्व घटकांसाठी काम केले. महाराष्ट्राला भरभरून निधी दिला. मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि कार्यकर्ता म्हणून राहणार आहे, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, मी स्वत:ला एक मुख्यमंत्री कधीच समजलो नाही. एक सामान्य माणूस म्हणून मी काम केलं. सर्वसामान्य जनतेसाठी आपण काही तरी केलं पाहिजे.कारण मी पण एका शेतकरी कुटुंबातून आलोय. मी भाषणात पण माझे विषय मांडले. ज्या दिवशी असा अधिकार माझ्याकडे येईल तेव्हा मी सामान्य लोकांसाठी काम करेल. काहींना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती. आम्ही या अडीच वर्षांच्या काळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
तसेच महायुतीमध्ये मी काहीही ताणून ठेवलेलं नाही. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आला होता. त्यामुळे आता मोदी आणि शाहांचा निर्णय अंतिम असेल. याशिवाय महायुती सरकारला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.