नाशिक | Nashik
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून, मी महाराष्ट्राच्या (Maharashtra) हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागू लागली आहे.
तसेच या युतीच्या (Alliance) चर्चांवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यामध्ये आता माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील भर पडली असून, त्यांनी शिवसेनेत (Shivsena) असतानाची एक आठवण सांगितली आहे. तसेच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद पुन्हा निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आज भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळची आठवण करून देतांना एक किस्सा सांगितला आहे.
यावेळी ते म्हणाले की, “मला शिसेना सोडून बारा वर्ष झाली होती. त्यावेळी मी कोणाशीही फारसा बोलत नव्हतो. मात्र, मला जेव्हा कळलं राज ठाकरे बाजूला जात आहेत त्यावेळी मी स्वतःहून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फोन केला होता. मी सांगितले की, माझे ऐका आठ दिवस शांत राहा. त्याप्रमाणे ते राहिले. पण, दुर्दैवाने जे व्हायचे ते झाले. आता ते दोघं एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणाला होणार आहे. माझा पक्ष वेगळा आहे. बाळासाहेब असतानाच मी बाहेर पडलो आहे. पण शिवसेनेबद्दल आमचे प्रेम कमी झालेले नाही. सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल”, असे भुजबळ यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र आली तर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) निश्चितपणे परिणाम होईल. शिवसेनेची शक्ती वाढेल. दोन कार्यकर्ते आम्हाला मिळाले तर शक्ती वाढल्यासारखं वाटतं हे तर लीडर आहेत. एखादा पडलेला आमदार सुद्धा आम्ही आमच्यातला घेतला तर शक्ती वाढेल, असे म्हणतो, हे तर लीडर आहेत”, असे भुजबळ यांनी सांगितले.
मंत्रिपदाचा निर्णय अजित पवारांवर सोपवलाय
आज अजित पवारांच्या (Ajit Pawar) नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये छगन भुजबळांना मंत्रिमंडळात संधी मिळावी,यासाठी फलक लावण्यात आले होते. परंतु, काही कारणास्तव अजित पवारांचा दौरा रद्द झाला. मात्र नाशिकमध्ये लावण्यात आलेल्या फलकाबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की,”कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि कार्यकर्ते डायरेक्ट जाऊन बोलू शकत नाही. त्याच्यामुळे आमच्या प्रेमापोटी लावलेले असेल. त्याचा काही फारसा परिणाम होतो, असं नाही. हा विषय त्यांच्यावरच (अजित पवार) सोपवलेला आहे, असे त्यांनी म्हटले.