मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या (BJP Entray) चर्चांनी काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. आगामी वाढदिवसाच्या सोहळ्यात खडसे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार, असेही बोलले जात आहे. मात्र, आता या संपूर्ण चर्चांवर खुद्द एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीच पडदा टाकला आहे.
माध्यमांशी बोलताना खडसे यांनी “मला आता भाजप प्रवेशात कोणताही रस (इंटरेस्ट) राहिलेला नाही, मी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहीन,” अशी ठाम भूमिका त्यांनी जाहीर केली. तसेच भाजप प्रवेशाबाबत दिल्लीतून (Delhi) ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
अमित शाह यांनी फोन करून बोलावले होते, पण…”
भाजप प्रवेशाच्या पडद्यामागील घडामोडींवर बोलताना खडसे म्हणाले की, “होय, मी दिल्लीला गेलो होतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला स्वतः फोन करून बोलावले होते. त्यांनी मला स्पष्टपणे ‘भाजप जॉईन करो’ असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मला सांगण्यात आले की, ‘तुम्हाला जर पक्षात प्रवेश दिला, तर स्थानिक लोक काम करणार नाहीत. खडसेंना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेची (Loksabha) जागा पाडून टाकू’, अशी थेट ब्लॅकमेलिंग वरिष्ठांना केली जात होती. याच कारणामुळे वरिष्ठांनी मला ‘तुम्ही लोकसभेत आमचे काम करा, पुढे पाहू’ असे सांगितले होते”, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
कार्यकर्ते जातील, मी नाही!
भाजप प्रवेशाच्या चर्चा धुडकावून लावताना खडसे पुढे म्हणाले की, “माझे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत आणि ते भाजपमध्ये जातील, पण मी जाणार नाही. मी शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच भाजप नेते गिरीश महाजन म्हणतात की माझा खडसेंच्या पक्षप्रवेशाला विरोध नाही, मग माझ्या प्रवेशाला नेमका विरोध करतोय कोण? असा थेट सवालही नाथाभाऊंनी उपस्थित केला.
गिरीश महाजन खूप लहान माणूस – खडसेंचा टोला
याचवेळी एकनाथ खडसे यांनी त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. खडसे म्हणाले की,”गिरीश महाजन हे खूप लहान माणूस आहेत. ते मंत्री होईपर्यंत मी त्यांना सर्व प्रकारे मदत केली आहे. आज ते जे काही आहेत, ते केवळ मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वाच्या पाठिंब्यामुळेच आहेत, त्यांना स्वतःची अशी ओळख नाही,” असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.
विनोद तावडेंच्या भेटीवर दिले स्पष्टीकरण
अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत भेट झाली होती. या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले होते. यावर स्पष्टीकरण देताना खडसे म्हणाले की,”विनोद तावडे यांच्यासोबत झालेली भेट केवळ एक औपचारिक भेट होती. त्यांनी फक्त माझ्या प्रकृतीची (तब्येतीची) विचारपूस केली. याव्यतिरिक्त आमच्यात कोणताही राजकीय विषय झालेला नाही. मी त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच मी नितीन गडकरी साहेबांनाही निमंत्रण दिले असून त्यांनी कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले आहे”, असेही त्यांनी सांगितले.




