मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवार (दि.१५) रोजी पार पडला. यात एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या (शिंदे गट) ११ आणि राष्ट्रवादीच्या (९) आमदारांचा समावेश होता. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये भुजबळ यांच्या समर्थनार्थ समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित केला असून ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, त्याआधी आता छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) नाराजीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) दखल घेण्यात आली असून त्यांची समजूत काढण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीची तारीख अद्याप ठरलेली नाही.परंतु, तिन्ही नेते नाशिकमध्ये जाऊन भुजबळ यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यात अजित पवारांना (Ajit Pawar) यश येणार का?, हे बघणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना “माझ्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यामुळे मंत्रिपदी मला कोणी डावलले याची मी माहिती घेत आहे”,असे त्यांनी म्हटले होते. आपल्यासारख्या बहुजन नेत्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नव्हता, असे छगन भुजबळ यांनी सूचित करत एकप्रकारे आपल्या मंत्रिपदासाठी (Ministership) अजित पवारांनीच नाकारल्याची चर्चा आहे. तसेच ‘छगन भुजबळ यांना मंत्री करावे’, असे पक्षातील अन्य काही आमदारांचे म्हणणे होते, अशी माहितीही समोर आली होती.